जळगाव : वर्ष उलटूनही किराणा साहित्याचे पैसे न देणाऱ्या बाप-लेकाविरुद्ध शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण शिंदे व परेश सुनील शिंदे (रा़ मोहननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे.लक्ष्मीनगरातील रहिवासी शैलेश जमनादास भाटिया यांचे किराणा दुकान आहे़ दुकानातून सुनील शिंदे व परेश शिंदे यांनी जून २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत अडीच ते तीन हजार रुपयांचे किराणा साहित्य खरेदी केले. मात्र, भाटिया यांनी किराणा साहित्याचे पैसे मागितले असता, वाहनाच्या डिक्कीतून पैसे आणून देतो सांगून बाप-लेक तेथून निघून गेले. अद्याप पैसे न मिळाल्यामुळे अखेर भाटिया यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय सपकाळे करीत आहेत.