जळगाव : वानखेडे सोसायटीतील कविता योगेश नेटके (वय ३०) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती योगेश वसंत नेटके, सासरे वसंत अर्जुन नेटके व सासू लताबाई वसंत नेटके या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता नेटके यांनी धान्यात टाकण्याचे विषारी औषधप्राशन केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता वानखेडे हाउसिंग सोसायटीत घडली. दरम्यान, दुपारी १२ वाजता कविताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता कविताचे वडील मधुकर नथ्थू वानखेडे (रा. रामेश्वर काॅलनी) यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ट्रॅव्हल्स बस घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत, यासह चारित्र्यावर संशय व्यक्त करून कविताचा छळ केला जात होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक मगन मराठे तपास करीत आहेत.