भडगाव : येथील टोणगाव भागात शनिवारी झालेल्या सामूहिक आत्महत्तेप्रकरणी मयत बब्बू सय्यद यांचे घरमालक इलियास बेग व त्याचा जावई साजिद शेख याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आले आहे.या प्रकरणात ९ वर्षीय मृत बालक ईसम सय्यद या बालकाच्या खुनाचे रहस्य उलगङत नाही तोच ८ दिवसांनी बालकाचे वङील बब्बू सय्यद, आई पिंकी सैयद, बहीण स्नेहा सैयद या तिघांनी शनिवारी आत्महत्या केली होती. ही सामुहिक आत्महत्या पैशाच्या तगाद्यामुळे व मुलाच्या खुनातील मानसिक त्रासाला कंटाळून झाल्याचे उघडकीस आले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी येथील टोणगाव भागातील रहिवाशी इसम बब्बू सय्यद याचा अनैसर्गिक कृत्य करून खून करण्यात आला होता. त्याचा पोलीस कसून तपास करीत होती. या दरम्यान मुलाच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी घरमालक इलियास बेग याने १५ हजार रुपयांची मागणी मृत मुलाच्या वडिलांकडे केली होती. त्यानुसार १५ हजार रुपये इलियास बेग यांचा जावई साजिदकडे दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी मयत बब्बू सय्यद यांचा मुलगा फिर्यादी न्हाहिद उर्फ हमजा सय्यद याने रविवारी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडील बब्बू सय्यद यांनी इलियासने एक लाख वीस हजार रुपये घेतल्याचे आपल्याला सांगत ते अजून परत केलेले नसल्याचे म्हणाले होते. त्या साठीच ते येथे थांबले होते, अन्यथा २ महिन्यांपूर्वीच भडगाव सोडून जाणार होते, असे बब्बू सैयद यांनी सांगितल्याचे न्हाहीदचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर भडगाव येथून गेलो असतो तर माझा मुलगा मयत झाला नसता असेही त्यांनी बोलून दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खूनप्रकरणी पोलिसांना चुकीचे नावे सांगा, असेही बब्बू सय्यद यांना सांगण्यात येत होते. इसम सय्यद हा मृत झाला त्या दिवशी तो कुणासोबत गेला होता हे घरमालक इलियास बेग यांना माहीत असूनदेखील सांगितले नाही व मी दु:खात असताना माझ्यावर जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते, असे बब्बू सय्यद यांनी सांगितल्याचे न्हाहिद उर्फ हमजा सय्यद याने सांगितले. ही सांगितलेली सर्व हकीकत व सुसाईड नोट मधील माहिती मिळती जुळती दिसून येत आहे, असे मयत बब्बू सय्यद याचा मुलगा न्हाहिद उर्फ हमजा याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.त्यावरून भडगाव पोलिसात तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा घरमालक इलियास बेग व त्याचा जावई साजिद शेख याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. या दोघांना ताब्यात घेत अटक केले आहे.मृतदेह नागपूरकडे रवानाभङगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजेनंतर तिघांचे शवविच्छेदन करुन दुपारी कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला व रुग्णवाहीकेसह नातेवाईक नागपूरकङे रवाना झाले. यावेळी मयत बब्बू सय्यद यांचा मुलगा नाहीद उर्फ हमजा बब्बु सय्यद नागपीर, बहीण अनीसाबी सैय्यद मुंबई, बहीणीची सासी रजिकु निसा नागपूर, काका रिजवान पाजरीद, मुंबई यांच्यासह काही नातेवाईक उपस्थित होते. त्यांचा आक्रोश मन होलावणारा होता. नागपूर येथून १५ कि.मी. अंतरावरील कामठी येथे दफनविधी करण्यात आला.शवविच्छेदन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पथक आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ङॉ. पंकज जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांचेसह पोलीस कर्मचारी हजर होते.सायंकाळी नाशिकचे आयजी छेरींग दोरजे यांनी पोलीस स्टेशन व घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांचेसह अधिकारी हजर होते.
भडगाव येथील सामूहिक आत्महत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:59 PM