जळगाव : पोलिसात तक्रार दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी मुकेश तुलसीदास टेकवानी (रा. आदर्श नगर) या व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, मनोज वाणी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
शहरातील व्यावसायिक मुकेश तुलसीदास टेकवानी यांच्याकडून मनोज वाणी यांनी जुनी कार खरेदी केली होती. गाडीचे पैसे घेण्यासाठी ते वाणी यांच्याकडे तगादा लावत होते. त्याचा राग आल्याने २१ मे रोजी रात्री ११.३० वाजता टेकवानी यांना फोन करून शिवीगाळ करीत माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, असा दम दिला. दरम्यान, टेकवानी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल केली असून, मला व माझ्या परिवाराला धोका निर्माण झाल्यास त्यास विनोद देशमुख आणि मनोज वाणी जबाबदार असतील, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी विनोद देशमुख यांना विचारले असता मनोज वाणी यांनी कारबाबत कंपनीकडे तक्रार केली होती. त्याचा त्यांना राग आला. त्याशिवाय नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात एका महिलेला आपण मदत केली होती, म्हणून माझ्याविषयी त्यांना राग असल्याने या प्रकरणात नाव गोवण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.