सुनील पाटील
शहरात काही महिन्यांपासून थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागल्याचे काही घटनांवरून सिद्ध होत आहे. आपआपल्या पोलीस हद्दीतील गुन्हेगारांचे बीट प्रमुख असो किंवा गुन्हे शोध पथके यांचा त्यांच्यावर वचक नसल्याचे हे द्योतक मानावे लागेल. गुन्हेगार दत्तक योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचेही त्यामागील एक मोठे कारण आहे. दर आठवड्याला उपअधीक्षक गुन्हेगारांची पडताळणी घेतात, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. एकूणच पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. दोन दिवसांपूर्वी फातेमानगरात झालेला वाद, तेथून कंपनीत जाऊन केलेली धुडगूस, असली-नकली पिस्तुलीचा खेळ यातून गुन्हेगारांची हिंमत वाढतच चालली आहे. अशा घटनांमध्ये जे गुन्हेगार नाहीत, तेही गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गेल्या महिन्यात तीन अमळनेरच्या तीन गुन्हेगारांवर मोक्काचा प्रस्ताव पाठविला व इतकेच नाही, ही कारवाई का आवश्यक आहे, हेही तितकेच महानिरीक्षकांना पटवून दिले. त्यामुळे या गुन्हेगारांची नाशिक कारागृहात रवानगी झाली. या आधीही रावेर दंगलीतील काही जणांवर अशीच कारवाई झाली. मात्र, उच्च न्यायालयातून दोघांना दिलासा मिळाला. अलीकडच्या काळात प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात खुनाचा प्रयत्न केल्याचे १२७ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले आहेत. हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार सातत्याने उपसत राहिले, तरच गुन्हेगारांमध्ये धाक तयार होऊ शकतो. सर्वच बाबी पोलीस अधीक्षक स्वत: करू शकत नाहीत. मात्र, त्या खालच्या यंत्रणेचीही काही जबाबदारी आहे, त्यांच्याकडून ती प्रामाणिकपणे निभावणे अपेक्षित आहे.