लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात संस्थेचे संस्थापक चेअरमन, संचालक, एजंट, सीए तर अवसायकाच्या काळातील चुकीच्या पद्धतीने ठेव पावत्या कर्जात मॅचिंग करणारे बडे कर्जदार अशा एकूण ३० जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर व आणखी इतर काही लोकांना अटक होणे बाकी आहे. संस्थेवर नवीन प्रशासकाची नियुक्तीही झालेली आहे. या सर्व प्रक्रियेत ज्या ठेवीदारांनी घामाचा, कष्टाचा पैसा या संस्थेत गुंतविला, त्यांना त्यांची रक्कम केव्हा मिळणार, असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
पुण्याच्या सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीत फसवणुकीचा आकडा १७ लाख ८ हजार ७४२ इतका होता तर आतापर्यंत तपासात ही रक्कम ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचली असून, अटकेतील बड्या कर्जदारांच्या चौकशीत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अशी आहे संशयितांची सद्य:स्थिती
सुजीत सुभाष बाविस्कर (४२, रा. सेंट्रल बँक कॉलनी) व विवेक देवीदास ठाकरे (४५, रा. देवेंद्र नगर) हे दोघेही अद्याप कारागृहात असून, त्यांचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आलेला आहे. धरम किशोर सांखला (४०, रा. शिवकॉलनी), महावीर मानकचंद जैन (वय ३७, रा. गुड्डूराजा नगर), कमलाकर भिकारी कोळी (२८, रा. के.सी. पार्क), सूरज सुनील झंवर (२९, रा. जय नगर) आदी जामिनावर आहेत. कायदेशीर सल्लागार प्रकाश जगन्नाथ वाणी (रा. ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तर जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा. शिवाजी नगर), सुनील देवकीनंद झंवर (रा. जयनगर), योगेश किशोर साखला (रा. शिव कॉलनी), योगेश रामचंद्र लढ्ढा (रा. पाळधी, ता. धरणगाव) व माहेश्वरी (रा. जळगाव) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या कर्जदारांची कारागृहात रवानगी
प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव), जयश्री अंतिम तोतला, भागवत गणपत भंगाळे (रा. जळगाव), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला (सर्व रा. जळगाव, ह.मु. मुंबई), छगन श्यामराव झाल्टे (रा. महुखेडा, ता. जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (रा. जामनेर), राजेश शांतीलाल लोढा (रा. जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा. धुळे), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई, मूळ रा. जळगाव) या बड्या कर्जदारांची मंगळवारी पुणे न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.
राज्यात ८१ गुन्हे, १२ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल
बीएचआर अपहार व फसवणूक प्रकरणात चेअरमन व संचालक यांच्याविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यांत ८१ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव न्यायालयात चालविले जाणार आहेत. १२ गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र न्या. आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात दाखल झाले. उर्वरित ६९ गुन्ह्यांचे दोषारोपपत्रदेखील याच न्यायालयात दाखल होणार आहे. या सर्व गुन्ह्यांत जळगावचेच १४ आरोपी असून, त्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनी याच्यासह, १२ संचालक व एक व्यवस्थापक अशा १४ जणांचा सहभाग आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.
नऊ राज्यांत विस्तार
बीएचआर या संस्थेचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व छत्तीसगढ या नऊ राज्यांत विस्तार असून त्याचे मुख्यालय जळगाव आहे. २०१५ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेचे ९० हजार ठेवीदार असून त्यांची ८७१ कोटी रुपयांची देणी बाकी आहे. त्याशिवाय २२ हजार कर्जदार असून त्यांच्याकडून ७२४ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे नमूद आहे.
असे आहेत कारागृहातील संचालक
बीएचआरमध्ये झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात शिवराम चावदस चौधरी (८०, रा. शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून राज्यातील पहिला गुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ४०९, ४२०, १२० ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९१ चे कलम ३ प्रमाणे दाखल आहे. यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (६०), दिलीप कांतीलाल चोरडीया (५६), सूरजमल भबुतमल जैन (५५), दादा रामचंद्र पाटील (७१), भागवत संपत माळी (६८), राजाराम काशिनाथ कोळी (५२), भगवान हिरामण वाघ (६५), यशवंत ओंकार जिरी (६५), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (६०), सुकलाल शहादू माळी (५०), ललिताबाई उर्फ लता राजू सोनवणे (४४) (सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर), मोतीलाल ओंकार जीरी (५५, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५७, रा. जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४५, रा. जळगाव) यांना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.
दृष्टिक्षेपात बीएचआर
एकूण शाखा : २६४
एकूण गुन्हे : ८१
एकूण आरोपी : १५ (संचालक)
अटकेतील आरोपी : १४ (संचालक)
फरार आरोपी : ०१
एकूण गुन्ह्यात दोषारोप : १२
शिल्लक गुन्ह्यातील दोषारोप : ६९
आरोपींची सद्य:स्थिती : कारागृहात
अवसायक काळातील अटक आरोपी : १७
अवसायक काळातील पाहिजे आरोपी : ०५