अमळनेर : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील मिळकत विक्रीबाबतचा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तसेच संचालकपद अपात्र न करण्याच्या मोबदल्यात दोन लाखाची खंडणी मागून, त्यापैकी 50 हजार रुपये घेतल्याप्रकरणी कृउबा सचिवाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिवाने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत कृउबा संचालकाने कानशिलात लगावून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.कृउबा संचालक विजय प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अमळनेर बाजार समितीच्या मालकीची नांदेड उपबाजार जागा लिलावाने बेकायदेशीररित्या विक्रीचे ठरविले होते. या जागेची किंमत 5 ते 6 कोटी असतांना, आरोपी सचिवाने सदरची मिळकत 60 ते 80 लाखार्पयत विक्री करण्याचे कारस्थान केले. याबाबत मी जिल्हा उपनिबंधकांकडे या बेकायदेशीर विक्रीला विरोध केला. तसेच आरोपीने माङयाविरुद्ध कृउबा समिती संचालक पद रद्द होण्याबाबतचा खोटा ठराव मंजूर केला. आरोपीने तुमचे संचालकपद पुन्हा प्रस्थापित करून देतो, त्यासाठी दोन लाख रूपये द्या अन्यथा तुमचे संचालकपद कुठल्याही परिस्थितीत रद्द करून आणू असे सांगत खंडणीची मागणी केली. दि.2 जानेवारी 17 रोजी सायंकाळी कृउबा समितीच्या गेटजवळील हॉटेलमध्ये सुभाष देसले, दीपक पाटील यांच्या समक्ष आरोपीला 50 हजार रुपये दिले. याप्रकरणी सचिव डॉ. उन्मेषकुमार राठोड यांच्याविरुद्ध भादंवि 384, 506 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.(वार्ताहर) संचालकपद रद्द करण्याच्या सुनावणीस हजर राहत असल्याचा राग येऊन कृउबा संचालकाने सचिवाच्या कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात कृउबा संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4कृउबा संचालक विजय प्रभाकर पाटील यांना अपात्र ठरविण्याबाबत सभापती व संचालक मंडळाने ठराव केला होता. त्याची सुनावणी अमळनेर येथील सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे. त्या सुनावणीस कृउबा सचिव डॉ. उन्मेष राठोड हे हजर राहत असतात. तुम्ही सुनावणीला हजर का राहतात असा जाब विचारत विजय पाटील हे दुपारी कृउबा कार्यालयात गेले. त्यांनी सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्या कानशिलात लगावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. डॉ. राठोड यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विजय पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कृउबा सचिवाविरुद्ध खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 1:26 AM