विजयकुमार सैतवाल, जळगाव : संचित रजा संपल्यानंतरही कारागृहात न परतलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (२६, रा. तांबापुरा) हा सुरत येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कारागृहात न परतल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्याला पोलिसांनी पकडले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा होऊन ते नाशिक कारागृहात होता. २१ नोव्हेंबर रोजी त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्यानंतर तो बाहेर आला होता.
१३ डिसेंबर रोजी त्याची रजा संपल्यानंतरदेखील तो कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कारागृह शिपाई महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या शोधासाठी पोलस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, इम्रान बेग, छगन तायडे, ललित नारखेडे, किरण पाटील साईनाथ मुंढे यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिल्या. गुड्डु सुरत येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पथकाने पकडले. त्याला मंगळवार, १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली.