जळगाव : पिस्तुलाचा धाक दाखवून जळगाव शहरातून १५ लाख रुपये लुटणाऱ्या खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (२२, रा. मोहाडी, धुळे) व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१८९, रा. पवन नगर, धुळे) या दोघांनी ५ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव तालुक्यात सायन बु., ता. मालेगाव येथे सुनील श्रावण चौधरी (४४, रा. लोंढे, ता. चाळीसगाव) या कापूस व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून २० लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा गुन्हाही एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला असून त्यात अविनाश सुरेश माने (१९, रा. दगडी चाळ, धुळे) याला अटक करण्यात आली आहे. जळगाव व मालेगावात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यात २० लाख ६१ हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पंचमुखी हनुमान मंदिराच्या परिसरात १ मार्च रोजी महेश चंद्रमोहन भावसार व संजय विभांडीक यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोघांनी १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली होती. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी घटनास्थळी पडलेली गुन्हेगारांची दुचाकी शोरूममध्ये नेऊन मालक निष्पन्न केला होता. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, तपासाधिकारी विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सचिन मुंढे, इम्रान सय्यद, मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर व सचिन पाटील यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन खुशाल व रितीक या दोघांना निष्पन्न केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दोघांच्या उल्हासनगरातून मुसक्या आवळल्या. दोघांकडून धुळे, उल्हासनगर व सुरत येथून तीन टप्प्यात १३ लाख ३१ हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले. या गुन्ह्यातील अजून १ लाख ६९ हजार रुपये हस्तगत होण्याचे बाकी आहे.
एकाच्या तपासात दुसरा गुन्हा उघड
या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच एमआयडीसी पोलिसांनी दोघांना खाकी हिसका दाखविला असता त्यांनी डिसेंबर २०२० मध्ये मालेगाव शहराच्या बाहेर चाळीसगाव रत्यावर कापूस व्यापाऱ्याचे अशाचे पध्दतीने २० लाख रुपये लुटल्याची कबुली देतानाच त्यात आणखी एकाचा समावेश असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तिसरा साथीदार अविनाश माने याला ताब्यात घेतले. त्याशिवाय ७ लाख ३० हजाराची रक्कमही हस्तगत करण्यात यश आले. ही रोकड व तिसरा आरोपी मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
दोघेही सराईत गुन्हेगार निर्व्यसनी
अटकेतील मनोज व रितीक दोघही सराईत गुन्हेगार आहेत. मनोज याच्याविरुध्द नाशिकमधील गंगापूर, अंबड, मुंबई नाका, यासह धुळ्यात ४ असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत तर रितीकविरुध्द धुळे व नाशिक उपनगर पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. दोघांचे राहणीमान उच्चभ्रू असून त्यांना कोणतेही व्यसन नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी हवाल्याच्याच पैशांवर त्यांनी डल्ला मारला आहे, परंतु त्या पैशाचे त्यांनी काय केले, हे एक कोडेच आहे.