आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : घरफोडीच्या तयारीत असलेल्या गणेश नारायण काळे या अट्टल गुन्हेगारास रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांनी इंद्रप्रस्थ नगरात पहाटे तीन वाजता पकडले. त्याला अटक करुन त्याच्याविरुध्द कलम १२२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. गणेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार आहे. दरम्यान, पोलिसांना पाहिल्यानंतर पळत असताना चिखलात कोसळल्याने तो पोलिसांच्या हातात लागला.घरफोडीच्या गुन्ह्यातील बहुतांश गुन्हेगार हे सध्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या कोठडीत आहेत तर काही जण कारागृहात आहेत. असे असतानाही शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व गुन्हेगारांची सद्यस्थिती तपासली असता ही माहिती समोर आली. त्यामुळे सांगळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या गुन्हे पथकाला रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या. स्वत: सांगळे तसेच परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील हे सोमवारी रात्री गस्तीवर होते.
इंद्रप्रस्थ नगरात आढळला संशयितशहर पोलीस स्टेशनचे प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, गणेश शिरसाळे व मोहसीन बिराजदार आदींचे एक पथक गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात गणेश काळे हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो चिखलात कोसळला. त्याच अवस्थेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.