एकीकडे मशागतीसह पेरणी सर्वत्र आटोपली असून, पावसाची अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल, ही अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारीने पैशांची जुळवा-जुळव करून खते, बियाण्यांचे नियोजनही केले. ज्या शेतकरीवर्गाकड़े पाण्याचे स्रोत आहे, त्यांनी पावसाची वाट न पाहता आपल्या शेतातील पेरण्या आटोपून घेतल्या. कोरडवाहू शेतकरीवर्गाने मागील आठवड्यात तुरळक झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल, म्हणून रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेतली. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळी हंगामात घेतलेली रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नसून, शासनही वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची, या इराद्याने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. पावसाचे वातावरण पाहून शेतकऱ्यांनाही विचार न करता खरेदीसाठी उत्साह दाखवला.
पावसाअभावी कोमटे जळण्याच्या मागावर :
मागील आठवड्यात पावसाच्या काही प्रमाणात सरी बरसल्याने आता पावसाला दमदार सुरुवात होईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनी १०० टक्के पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे खराब होत आहे. काही ठिकाणी बियांना कोमटे फुटून जळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकरीवर्गाच्या भोवती फिरत आहे. उन्हाळ्यासारख्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेनेदेखील पेरलेले बियाणे खराब होत आहे.
फोटो : अर्पण लोढा, वाकोद २४/१