लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात यावर्षी मान्सून निर्धारित वेळेच्या काही दिवस लवकर आला असला तरी, जून महिन्यात यावर्षी सरासरीपेक्षा एकूण १५ टक्के कमी पाऊस पडला आहे. आता तब्बल चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अजून चार ते पाच दिवस पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच राहणार नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८ ते ९ जुलैपर्यंत पावसाची शक्यता कमीच असून, १० जुलैनंतरच जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस होऊ शकतो अशी माहिती पुणे येथील हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात पडलेल्या पावसाने तब्बल १० वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढून, एकूण सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस जून महिन्यात पडला होता. मात्र, यावर्षी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत केवळ १३ टक्केच पाऊस झाला आहे. तसेच जुलै महिन्यात देखील अजून काही दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करायला सुरुवात केली होती. मात्र, आता पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात ३० टक्के पेरण्या
जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडल्यामुळे पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मका, उडीद, मूग व सोयाबीन लागवड देखील सुरू झाली होती. आता पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग व उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे उडीद तग धरून असले तरी, येणाऱ्या काही दिवसात उडीद देखील जळून जाण्याची भीती आहे.
पावसाला ब्रेक का लागला ?
हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी १ जून रोजी जाहीर केलेल्या अंदाजात जून व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविली होती. मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यात ८ ते १० कि.मी.ने वारे वाहतात. मात्र, यावर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यात केवळ २ कि.मी. वेगाने वारे वाहिले होते. यावरूनच जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाला अनेक अडथळे निर्माण झाले. त्यातच आता देखील हवेचा दाब कमी असल्याने मान्सूनला ब्रेक लागत आहे. येणाऱ्या काही दिवसात हवेचा दाब वाढून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १० जुलैनंतरच पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून, १५ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी व्यक्त केली आहे.
प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण
पावसाने दडी मारली असून, वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढली आहे. त्यातच तापमानात देखील २ ते ३ अंशाची वाढ झाल्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. दमट हवामानामुळे नागरिकांना घरात थांबणे देखील कठीण बनले असून, असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.