बोदवड : शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावातील अनेक प्रभागात गेेल्या १७-१८ दिवसांपासून पाणीच आले नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ निवारण समितीमार्फत टँकरने मोफत पाणी पुरवले जात आहे.
शहरातील पाणीटंचाईवर गत साडेचार वर्षात काहीच हालचाल न झालेल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये पाईपलाईन टाकण्याचा धडाका सुरू केला आहे. या प्रभागातील मारवाडी गल्ली, बाहेरपेठ, गोरक्षनाथ नगरमध्ये तब्बल २२ जोडणीची पाईपलाईन सार्वजनिक विहिरीवरून करून देण्यात आली आहे. याच प्रभागात नगरसेवकाच्या मित्राच्या घरात गुपचूप एक कनेक्शन करून देण्यात आले असून जेव्हा जेव्हा शहरातील सार्वजनिक विहिरीचे पाणी सोडले जाते, तेव्हा तेव्हा या खासगी नळ असलेल्या मित्राच्या घरात पाणी आयते जाते. तर दुसरीकडे याच प्रभागातील काही भागात मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शहरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, अनेक प्रभागात सतरा ते अठरा दिवस नळाला पाणी येऊन झाले आहेत. पाणी नियमितपणे मिळावे, अशी बोदवडवासीयांची अपेक्षा आहे.