प्रदीप : अहो, अहो, मिस्, अहो कशा चालल्या आहात तुम्ही रुळांच्या मधून? काय मरायचंय का तुम्हाला?शिखा : (अडखळत) का... काय? म... मरायचंय का? नाही नाही...प्रदीप : नाही ना? मग नीट चला ना? मला वाटलं की तुम्ही बहुतेक आत्महत्या करण्याच्या इराद्यानं आलाय? उडी मारणार की, काय गाडी आली म्हणजे...शिखा : छे छे! मी काही लेचीपेची नाहीये.. आत्महत्या वगैरे करणार नाही... मुळीच नाही... अजिबात नाही....प्रदीप : हो हो हो! पण एवढे चिडताय कशामुळे ?शिखा : आणि, काय हो? मला तुम्ही छेडताय.. पण तुम्ही तर मघापासून सारखे घुटमळताय- रुळाच्या आत बाहेर, आत बाहेर. माझे फक्त लक्ष नव्हते पण तुम्ही तर जाणून बुजून-प्रदीप : तुमचं लक्ष नव्हतं की, कसल्या विचारात होतात.... शिखा : हो, विचारात होते... पण तुमचं काय?प्रदीप : मी पण आत्महत्येच्या विचारात होतो.. म्हणजे आहे... मला नाही जगायचं.. पण धाडस होत नाहीये...शिखा : मी पण म्हणजे?प्रदीप : माझ्या मनात प्रचंड खळबळ चाललीय- टु बी आॅर नॉट टुबी. तुमचीही तशीच चालू आहे ना...शिखा : नाही नाही. घरी असताना एखादे वेळेस म्हणजे एकदाच विचार आला होता. पण आता नाही. आता मी फक्त आपल्याच तंद्रीत होते... निराळ्याच विचारात होते....प्रदीप : प्रेमभंगाच्या?शिखा : तुम्हाला कसं कळलं?प्रदीप : अहो इतक्या निर्जन ठिकाणी एकट्या अशा व्यग्र मनस्थितीमध्ये इथे रुळांमधून चालण्याचे दुसरे काय कारण असणार?शिखा : आणि तुम्ही- तुम्ही पण... प्रेम भंग? म्हणून आत्महत्या?प्रदीप : होऽ तसं पाहिलं तर आपण समदु:खी आहोत...शिखा : पण तुम्ही इतके हळवे कसे? माझं काय? मी एक मुलगी आहे. मी गेले तरी काही फरक पडणार नाही.. पण तुम्ही तुमच्यावर घरी कुणी अवलंबून असेल.. त्यांचं काय होईल?प्रदीप : त्याचं काय आणि कसं याचा विचार का करू? माझा प्रेमभंग नाही, दारुण विश्वासघात झाला आहे... त्याचं काय? ते मी कसं विसरू- कसं सहन करू.शिखा : पण असं झालं होतं तरी काय?प्रदीप : काही नाही, सगळं काही व्यवस्थित जुळून आले होते आणि ऐनवेळी आमच्या घरच्यांना जातीबाहेरचा मुलगा चालणार नाही म्हणून तिने कच खाल्ली... सगळं सगळं फिसकटलं!शिखा : कमाल आहे, पण हे आधी नव्हतं का कळलं?प्रदीप : कल्पना नाही, काय सांगणार? आईवडिलांना मी दुखावू शकत नाही, असे सांगून तिने काढता पाय घेतला...शिखा : आजही हे असेच चालू आहे ना? जातपात आणि काय काय?प्रदीप : पण, पण ... तुमचं तुमचं काय झालं? का ही अशीच रडकथा?शिखा : नाही. आमचंही बरेच दिवस ठीक चाललं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून अचानक त्याचा नूर बदलला, तो मला टाळायला लागला.प्रदीप : पण का? कशामुळे.शिखा : मला ते नंतर समजलं! मी हुशार म्हणून मला नावाजणारा तो आता ब्युटी अॅण्ड ब्रेन नको तर ब्युटी अॅण्ड मनी पाहिजे म्हणाला!प्रदीप : अरे अरे अरे ! म्हणजे हुंडा?शिखा : नुसता हुंडा नाही. त्याचं आता जिच्याशी लग्न ठरलं आहे तिचे वडील त्याला स्वत:ची कंपनी काढून देणार आहेत. बिल्डींग कन्स्ट्रक्शनची आता तो नोकरी करीत आहे दुसऱ्याकडे.प्रदीप : मलाही शंका येते आहे की, जातीचे कारण सांगतात, पण तिला माझ्यासारखा साधा चाकरमान्या. सॉफ्टवेअरचे काम करणारा नको होता. ती मला फक्त खेळवत होती.शिखा : आणि हा.. हा मला फिरवत होता. म्हणजे दोघांनीही आपल्याला टाईमपास म्हणून वापरलं होतं.प्रदीप : नक्की! तसंच असणार! मला तर खात्री आहे की, तिचे लफडे चालूच होते मला ठाऊक नव्हते. एकाच इमारतीत दोघांची आॅफीस.शिखा : एक्झॅक्टली मलाही याचा असाच संशय आहे. मी साधी कॉल आॅपरेटर मध्यमवर्गीय. त्याला या रश्मी- रश्मीनं होकार दिला आणि मला लगेच कटवलं. तिनंही कुणाला तर गंडवलच म्हणे..प्रदीप : रश्मी... रश्मी मराठे? मीच तो प्रदीप... मीच तो गंडवलेला.शिखा : होऽ होऽ आणि तिचं लग्न ठरलंय तो... का..प्रदीप : शेखर पाटील म्हणजे तुमचा .. प्रियकर... (दोघेही स्तब्ध)प्रदीप : (काही क्षणानंतर).. शिखा, शिखा तू शिखाच ना मला कळलं होतं हे. फोनवरून कुणाला तरी डिच केलंय ते, पण ऐक मला ब्युटी, ब्रेन, मनी काहीच नकोय. मात्र फक्त हार्ट हवंय ! तू मला हो म्हणशील का?शिखा : मला खराखुरा जोडीदार हवाय ! जीवनसाथी. प्रदीप मग करायचं का आपण आता हे क्रॉस मॅच?-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव
क्रॉसमॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:18 AM