लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गर्दी जमविण्यास निर्बंध असताना त्याचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणे १२ तरुणांना चांगलेच भावले आहे. या सर्वांविरुद्ध रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रामेश्वर काॅलनीतील अनिल लक्ष्मण घुले या तरुणाचा वाढदिवस २८ मे रोजी रात्री आठ वाजता अयोध्यानगर भागात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वीस ते पंचवीस तरुणांचा सहभाग होता वाढदिवसाचे फोटो दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेले एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यापर्यंत हे फोटो पोहोचले त्यांनी लागलीच फोटोमधील व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, गोविंदा पाटील सचिन पाटील, सतीश गर्जे व योगेश बारी यांना दिल्या. या पथकाने ज्याचा वाढदिवस होता त्या अनिल घुलेचा शोध घेतला. त्यानंतर फोटोमधील व्यक्तीचे नाव निष्पन्न केले.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
अनिल लक्ष्मण घुले, सुनील लक्ष्मण घुले (रा.रामेश्वर कॉलनी), रुपेश सोनार (रा.कांचन नगर), सोनूसिंग बावरी (रा.तांबापुरा) दत्ता थोरवे, मयूर वाणी, संदीप उर्फ राधे शिरसाठ (सर्व रा. रामेश्वर कॉलनी), सिकंदर पटेल (फातेमानगर) पप्पू पांडोळकर (रामेश्वर काॅलनी), विक्की पाटील (अयोध्यानगर), अक्षय पाटील (अयोध्यानगर ) व दीपक तरटे (नागसेन नगर) यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी, जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात या कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भादंवि कलम १८८, २६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अमलदार सतीश गर्जे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.