धानोरा,ता.चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी सातपुड्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सातपुडा पर्वतरांगेतील मनुदेवीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सध्या सुरू आहे.सातपुडा परिसरात पावसाने सर्वत्र आनेद पसरला आहे. या सुखद वातावरणात यावल तालुक्यातील सातपुडा जंगलात श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरासमोरील धबधबा पाहण्यासाठी भाविक, पर्यटक, तसेच प्रेमीयुगलांची गर्दी वाढलेली दिसते. अंदाजे ९० ते १०० फूट उंचीचा हा धबधबा आहे. चिंचोलीपासून उत्तरेला दहा ते बारा कि.मी. अंतरावर मनुदेवीचे स्थान असून पावसाळ्यात या ठिकाणी हजारो पर्यटक हजेरी लावतात. सातपुडा पर्वत जणू काही हिरवा शालू परिधान करीत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सातपुडा जंगलात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा धबधबा जिवंत झाला. येत्या पंधरा दिवसांत धबधब्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.पहिल्या पावसात कोसळणाऱ्या या धबधब्यात डोंगरावरून पाण्याबरोबर लहान-मोठे दगडगोटे कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या अगदीच धबधब्याजवळ भाविक व पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन मनुदेवी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्ह्याचे पर्यटनस्थळ म्हणून मनुदेवीला अग्रगण्य स्थान आहे. ते महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील भागातील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान आहे. येथील निसर्गरम्य वातावरणातील उंच टेकडीवरील धबधबा भाविक व प्रेमीयुगलांसाठी आकर्षण ठरतो आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी जिल्हाभरातून निसर्गप्रेमी येथे येतात. विशेषत: रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.
सातपुड्यातील मनुदेवी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 3:36 PM