लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एका कंपनीच्या प्रशासनाने लसीकरणाशिवाय कामावर येऊ नये, असे आदेश दिल्याने या कंपनीचे कर्मचारी व तरुणांनी लसीकरणासाठी धाव घेतल्याने चेतनदास मेहता रुग्णालयात शनिवारी प्रचंड गर्दी उसळली होती. या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. विशेष बाब म्हणजे काही नागरिकांनी उशीर होईल म्हणून दुपारच्या जेवणाचा डबा सोबत आणला होता.
चेतनदास मेहता रुग्णालयात शनिवारी कोव्हॅक्सिनचा सर्व वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध होता. यात ५० टक्के ऑनलाइन, तर ५० टक्के ऑफलाइन असे समीकरण होते. यात ऑफलाइन असलेले बाहेर गावचे तसेच जळगावातील बरेच नागरिक हे पहाटे ४ वाजेपासून केंद्रावर आलेले होते. अचानक १० वाजेपासून ऑनलाइन नोंदणीवाल्यांची गर्दी वाढल्याने या केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. मुख्य गेट उघडण्यासही अडचण येत होती. यासह प्रचंड ओढाताण व वाद या ठिकाणी होत होते. या ठिकाणी चार पोलीस तैनात करण्यात आले होते. गेट पूर्ण बंद करून कर्मचारी आतूनच सूचना देत होते. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना प्राधान्य दिले जात असल्याने गोंधळ अधिकच वाढला होता. दुपारी १ वाजता ऑफलाइन लसीकरण बंद झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, लस मिळेल या आशेने नागरिक थांबून होते. दुपारी एक वाजताही किमान २०० नागरिक या ठिकाणी थांबून होते.
बाहेरगावच्या ग्रामस्थांची धाव
शिरसोली येथील बरेच नागरिक या ठिकाणी लसीकरणाला आले होते. ग्रामीण भागात कोणाला ऑनलाइन नोंदणी जमते, असे सांगत गावात केवळ ५० डोस असल्याने शिवाय कंपनीत लसीकरणाशिवाय कामावर घेतले जात नसल्याचे सांगत या ग्रामस्थांनी चेतनदास मेहता रुग्णालयातील केंद्रावर धाव घेतली होती. यात महिलांची संख्या अधिक होती. यात रांगेत उभे राहण्यावरून वादही उद्भवले होते. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
भरतीला जाणाऱ्या तरुणांची फरफट
नाशिक येथे एअरफोर्सच्या भरतीला जाण्यासाठी मनीष सोनवणे, रोहित पाटील, दीपक राणे हे जळगावातील तरुण सकाळी पावणे सहा वाजेपासून चेतनदास मेहता रुग्णालयात आलेले होते. सहा ते सात तास सतत ते लस मिळेल या आशेने रांगेत उभे होते. त्यात गेटजवळ प्रचंड ओढाताण सुरू होती. आम्ही गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन केंद्र बुकिंग करण्याचा प्रयत्न करतोय मात्र, ते उपलब्धच होत नसून भरतीला जाण्यासाठी आम्हाला लस घेणे आवश्यक आहे. त्यातही ती मिळत नसल्याचे हे तरुण सांगत होते.