मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी : हॉकर्सवर कारवाईचे सत्र सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी बाजारपेठा सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची तुफान गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. यामुळे दुपारी १२ वाजेनंतर शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्यादेखील निर्माण झाली होती. अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्यामुळे ही कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा प्रशासनाने नवीन नियम लागू केल्यानंतर दुपारी ४ वाजेनंतर बाजारपेठा शांत झालेल्या दिसतात, तर वीकेंडच्या दोन दिवस शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने हे दोन्ही दिवस शहरातील सर्वच बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. मात्र, सोमवारी बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यानंतर सकाळी १० वाजेपासून बाजारपेठा पुन्हा गजबजल्या होत्या. शहरातील मुख्य मार्केटमध्ये नागरिकांना पाय ठेवण्यासाठीदेखील जागा शिल्लक नव्हती.
मुख्य रस्त्यांसह शहरातून बाहेर जाणारे रस्ते झाले ब्लॉक
सोमवारी नागरिकांची बाजारात मोठी गर्दी झाल्यामुळे सुभाष चौक, दाणाबाजार, फुले मार्केट भागात वाहनांना ये-जा करण्यासही जागा शिल्लक नव्हती. चित्रा चौक ते नेरी नाका, पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात दुपारी १२ वाजता वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हा मुख्य रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तब्बल तासाभरानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली. हेच चित्र याच भागात दुपारी २ वाजेनंतर पुन्हा निर्माण झाले होते. यासह सकाळी ८ वाजता अजिंठा चौक ते काशीनाथ चौकापर्यंतदेखील मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती, तर सुरत रेल्वेगेटजवळदेखील सोमवारी सकाळी ११ वाजता तब्बल १ तास वाहतूक खोळंबली होती. यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
हॉकर्सवर कारवाई सुरूच
वीकेंड लॉकडाऊननंतर मुख्य बाजारपेठ व मुख्य रस्त्यांलगत अनेक हॉकर्सने दुकाने थाटल्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. सोमवारी ३४ हॉकर्सचा माल मनपाकडून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे सोमवारी फुले मार्केटमध्येदेखील अनेक हॉकर्सने दुकाने थाटली होती. दरम्यान, दुपारी ४ वाजेनंतरदेखील ख्वॉजामिया चौक, बहिणाबाई उद्यान परिसर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने सुरूच होती.