जामनेर, जि.जळगाव : प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहमतीने गुरुवार या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी भरणारा आठवडे बाजार व नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी नागरिक गुरुवारऐवजी शुक्रवारी बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. यापेक्षा गुरुवारीदेखील बाजारपेठ सुरु ठेवली तर शुक्रवारी होणारी गर्दी टाळता येईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या पाच महिन्यांपासून आठवडे बाजार बंद आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक तीन सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात निर्बंध उठविण्यात आले. यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होत आहे. खरेदीसाठी एकाच दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमित पूर्णवेळ बाजारपेठ सुरू राहिली तर गर्दी कमी होईल, असे बोलले जात आहे.दरम्यान, सध्या आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केल्याने शहर व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होते म्हणून बाधित वाढतात, असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही. गेल्या महिन्यात सलग सात दिवस बंद असतानाही शहरात बाधित निघतच होते. सध्या शहराची स्थिती ग्रामीण भागाच्या तुलनेत सुधारत आहे.‘बंद’ची सक्ती न करता नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करणे, शारीरिक अंतर ठेवण्यास प्रवृत्त करणे, याबाबत नगरपालिका प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.
जामनेरला गुरुवार बंदमुळे शुक्रवारी वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:29 PM