दुपारी १२नंतर मात्र शुकशुकाट : चौकाचौकात आंबे विक्रेत्यांनी थाटली दुकाने; प्रशासनाकडूनही सूट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुक्रवारी साजरी होणारी अक्षय तृतीया व मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात विविध साहित्य व पदार्थ खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही महत्त्वाच्या सणांनिमित्त प्रशासनाने दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली असून, गुरुवारी दाणा बाजार, सुभाष चौक, बळीराम पेठ व सराफ बाजार परिसर येथे नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून शहरातील बाजारपेठा व मार्केटमधील अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. त्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. मात्र, अक्षय तृतीया व रमजान ईद या सणांमुळे प्रशासनाने दुपारी १२ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास आगामी दोन दिवस परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
आंबे व घागर खरेदीसाठीही सकाळी सात वाजल्यापासून बाजारात गर्दी
अक्षय तृतीयेला घागर पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे बाजारात घागर खरेदीसाठी नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातूनही अनेक नागरिक खरेदीसाठी शहरात आले होते. दाणा बाजार परिसरात धान्य व किराणा खरेदीसाठी गर्दी झाल्यामुळे या भागात पायी चालण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती.
सुभाष चौक परिसराला आले यात्रेचे स्वरूप
शुक्रवारी अक्षय तृतीयेसोबतच मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईददेखील साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कपडे, चप्पल व इतर खाद्यपदार्थ खरेदीसाठी सुभाष चौक, बळीराम पेठ यासह भीलपुरा चौक परिसरात नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक व पोलिसांचे पथकदेखील या भागात तैनात करण्यात आले होते. तसेच काही वाद निर्माण होणार नाही किंवा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होणार नाही, यासाठीही मनपा कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत होती.
दुपारनंतर शुकशुकाट, चौकात मात्र आंबे विक्रेत्यांची गर्दी
दुपारी १२ वाजल्यानंतर मुख्य बाजारपेठ परिसरातील जवळजवळ सर्वच दुकाने बंद झाल्यामुळे गर्दीदेखील कमी झाली. मात्र, शहरातील मुख्य चौक परिसरात आंबे विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे चौकाचौकांमध्ये काही प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी २ वाजता मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील मुख्य चौक परिसरात पाहणी करताच आंबे विक्रेत्यांनी पळ काढून आपला व्यवसाय बंद केला. काही विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई करून काही माल जप्तही केला.
कपड्यांची दुकाने लपून-छपून सुरूच
पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी करतात. त्यामुळे मुख्य बाजारपेठ परिसरात दुपारी १२ वाजल्यानंतरही काही कपडे व्यावसायिकांनी लपून-छपून आपले व्यवसाय सुरूच ठेवल्याचे चित्र बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर व शिवाजी रोड परिसरात पाहायला मिळाले. तसेच दुपारनंतर मनपाचे पथकही गायब झाल्याने शटर बंद करून अनेकांनी कपडे विक्रीचा आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता.