लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्येष्ठ नागरिक व अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दुपारी ज्येष्ठांची प्रचंड गर्दी उसळली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस आणि ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस असे एकत्रित नियोजन या केंद्रावर असल्याने दुपारी काहीसा गोंधळ उडाला होता. प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी हे स्वत: नोंदणीसाठी ॲप ओपन करून बसले होते.
खासगी केंद्रांवर गुरुवारी हे लसीकरण सुरू झाले होते. शुक्रवारपासून महापालिकेच्या या शासकीय केंद्रांवर मोफत लस देण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला ॲप स्लो असल्याने शिवाय डाटा एंट्री ऑपरेटर कमी त्यातही केवळ एकालाच ट्रेनिंग दिले गेले असल्याने काहीशी तारांबळ उडाल्याचे चित्र होते. गर्दी होत असल्याचे पाहून डॉ. रावलानी यांनी ॲप ओपन करून अनेकांची कागदपत्रे प्रमाणित केली. दुपारी दीड वाजेपर्यंत १३९ जणांची नोंदणी झालेली होती. प्रतीक्षालयासाठी जागा कमी असल्याने गर्दी वाढली होती. ८१ जणांना लस दिली गेली होती. त्यानंतर ते निरीक्षण कक्षात होते.
दुसऱ्या डोसला प्राधान्य
पहिल्या डोसला काहीसा उशीर झाला तर चालेल मात्र, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य असल्याने त्यांना आधी डोस दिला जात असल्याचे डॉ. राम रावलानी यांनी सांगितले. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस बाकी असून दिवसाला पहिला आणि दुसरा डोस असे मिळून २०० लोकांना आपण बोलवत असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी मोफत लसीकरण असून ज्येष्ठ नागरिकांनी व अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, जी दोन केंद्र बंद झाली आहेत ती शासनानेच बंद केली असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.