लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : टोनी पंजाबी व अरुण महाजन या दोन चाळीसगावकर सायकलवीरांनी ३८ तासात ६०० किमी बीआरएम स्पर्धेचे अंतर पार करुन पहिल्यांदाच मानाच्या सायकल स्पर्धेत चाळीसगावचे नाव कोरले आहे. त्यांना 'सुपर राईंडरचा' किताब मिळाला आहे. ही स्पर्धा शनिवारी धुळे येथून पहाटे सुरु झाली होती. सांगता रविवारी सायंकाळी झाली.
एडॉक्स गृपतर्फे आयोजित ६०० किमी बीआरएम सायकल स्पर्धेचे धुळे येथे आयोजन केले होते. शनिवारी धुळे येथील देवपूर बसस्थानक परिसरातून स्पर्धेच्या शुभारंभाचा सायरन वाजला. यात चाळीसगावच्या टोनी पंजाबी, अरुण महाजन व रवींद्र पाटील यांच्या सायकलींची चाके धावली. तथापि रवींद्र पाटील यांची सायकल दिडशे किमीचे अंतर पार केल्यानंतर नादूरुस्त झाल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर बडावे लागले. टोनी पंजाबी व अरुण महाजन यांनी मात्र मोठ्या जिद्दीने आपले लक्ष्य सर केले.
टार्गेट ३८ तासातच पूर्ण
धुळे ते मध्यप्रदेशातील टिकरी. तेथून परत धुळे आणि तेथून नाशिक ते पुन्हा धुळे. असा यास्पर्धेचा ६०० किमीचा मार्ग होता. यासाठी सायकलवीरांना ४० तास देण्यात आले होते. टोनी पंजाबी व अरुण महाजन यांनी ३८ तासात टार्गेट पार करुन जल्लोष केला. त्यांना 'सुपर राईंडर' हा सायकलवीरांसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या दोघा सायकलवीरांच्या रुपाने चाळीसगावला प्रथमच सायकलिस्ट एसआर मिळाले आहे. या त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
व्हॅलेंटाईनच्या प्रेममय पर्वणीवर आम्ही हे लक्ष्य गाठले. याचा विशेष अभिमान वाटतो. चाळीसगाव सर्वच क्षेत्रात पुढे आहे. सायकल स्पर्धेतही आपल्या गावाची मुद्रा उमटली पाहिजे. याचसाठी आम्ही सायकलला जिद्दीने पायडल मारले. चाळीसगावकरांनी २००, ३०० व ४०० किमीच्या स्पर्धेत यश मिळविल्यानंतर खूप प्रोत्साहन दिले. -टोनी पंजाबी, अरुण महाजन, एसआर सायकलिस्ट, चाळीसगाव.