मोहन सारस्वत, जामनेर, जि. जळगाव : बंदिस्त वाहनातून पशुधनाची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या सिल्लोड येथील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर येथे मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.
शेख मोहम्मद हुसेन कुरेशी (२६, रा.ईदगाह नगर, सिल्लोड) व नितीन राजेश पाटील (२३, रा.शास्त्रीनगर, सिल्लोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, प्रवीण सुशीर, सचिन गायकवाड व संतोष सोनवणे हे मंगळवारी दुपारी मराठी शाळेजवळ उभे होते. त्याचवेळी तिथे पिकअप व्हॅन थांबलेली होती. या कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी वाहनाच्या मागील बाजूस लावलेल्या लाकडी पाट्या बाजूला केल्या, त्यावेळी त्यात तीन गायी, वासरू व गोऱ्हा अशी पाच जनावरे आढळून आली. या पशुधनास उभे राहण्यास व श्वास घेण्यास पुरेशी जागा देखील नव्हती.
या कार्यकर्त्यांनी चालकास कागदपत्रांची विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे दाखविली नाही. गुरांना खाली उतरवून वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सुभाष पवार (रा.कस्तुरीनगर, जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मोहम्मद व नितीन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जयेंद्र पगारे तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"