सचिन देवजळगाव : खान्देशातील प्रवाशांच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत, भुसावळ-नाशिक व भुसावळ -नागपूर या पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने भादली-भुसावळ दरम्यान असलेल्या तिस-या लाईनच्या तांत्रीक कामासाठी रद्द केल्या आहेत. सुरुवातीला दीड महिना रद्द केल्यानंतर, पुन्हा २३ दिवस मुदत वाढविल्यामुळे प्रवाशांमधुन रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशाासनातर्फे आहे त्याच गाड्या वेळेवर सोडण्यात येत नसून,त्यात कुठल्याही तांत्रीक कामासाठी पॅसेंजरच रद्द करण्यात येत आहेत. मुंबईतील प्रवाशांप्रमाणे येथील प्रवासी कधी रेल रोको करत नसल्यामुळे, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे.. असा प्रश्न प्रवासी वर्गातुन उपस्थित होत आहे.जळगाव हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने, दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त जळगावला येत असतात. यामध्ये नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खाजगी प्रवाशी गाड्यांना दुप्पट भाडे असल्यामुळे, बहुतांश प्रवासी रेल्वेच प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात.मात्र, अलीकडे गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने विविध तांत्रीक कामासांठी इतर एक्सप्रेस गाड्या रद्द न करता, पँसेजरच रद्द करत आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यापासून दर महिन्याला कधी आठ दिवस तर कधी पंधरा दिवस पॅसेंजर बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना विशेषत: महिला प्रवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात तर रेल्वे प्रवाशाने प्रवाशांच्या सहनशिलतेचा ‘अंतच’ बघितला. १५ फेब्रुवारी ते तब्बल ३१ मार्च पर्यंत पाच पॅसेंजर रद्द केल्या होत्या. या पॅसेंजर १ एप्रिलपासुन सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, या गाड्या सुरु न करता, पुन्हा २३ एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे.तर प्रवाशांनी आक्रमण भुमीका का घेऊ नये..दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने तिसºया लाईनच्या कामासाठी महाराष्ट्र, काशी व हुतात्मा एक्सप्रेस ६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान रद्द केल्या होत्या. आधीच पॅसेंजर रद्द आणि त्यांत एक्सप्रेसही रद्द केल्यामुळे नाशिकपासुन ते अमरावतीपर्यंत सर्व संघटना आक्रमक झाल्या होत्या. डीआरएम आर. के. यादवांकडे असंख्य तक्रारी गेल्याने, वरिष्ठ स्तरावरुन सायंकाळी हा निर्णय मागे घेण्यात आला. जर मुंबईत लोकल उशिरा आली तर मुंबईकर ज्या प्रमाणे आक्रमक भुमीका घेतात, त्याच प्रमाणे आता खान्देशातील प्रवाशानींही कायदेशिर मार्गाने आक्रमक भुमीका घेणे गरजेचे आहे..
हा तर प्रवाशांच्या सहनशिलतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:02 PM