जळगाव - येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सांस्कृतिक समितीतर्फे गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, अध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे, सांस्कृतिक समिती प्रमुख स्नेहल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. सूत्रसंचालन संगीता संघवी यांनी केले.
गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करा
जळगाव - शहरात गुंठेवारीत घरे बांधलेल्या अनेक नागरिकांकडून दुप्पट दराने आकारणी केली जात आहे. गुंठेवारी नियमितीकरणासंबधी महानगरपालिकेच्या संबधित विभागाकडुन पुरेसे कार्य झाले नसल्याने मनपा उपमहापौर सुनील खडके यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबतीत मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. रेखांकन व्यावसायीकांनी नागरिकांकडून प्रत्येकी २० हजार रूपये आकारणी केली आहे. त्यामुळे गुंठेवारीतील बांधकामधारकांची फसगत होत असून, दोन वर्षांपासून बंद असलेली गुंठेवारी नियमीतीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी उपमहापौर सुनील खडके यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
महाराणी येसुबाई भोसले या कादंबरीचे आज प्रकाशन
जळगाव - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या जळगाव विभागीय केंद्राच्या वतीने शनिवारी दुपारी १२ वाजता एसएमआयटी महाविद्यालयात ज्ञानेश मोरे लिखीत ‘महाराणी येसुबाई संभाजी भोसले ’ या कादंबरीचे प्रकाशन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक अपात्रतेप्रकरणी २० रोजी कामकाज
जळगाव - घरकुल घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी जिल्हा न्यायालयात दाखल दाव्यातंर्गत शुक्रवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले. यामध्ये नगरसेवकांची बाजू वकील ॲड.प्रदीप कुलकर्णी यांनी मांडली, शिक्षेला स्थगिती मागितली असल्याने या प्रकरणी अंतीम स्वरुप प्राप्त झाले नाही. त्यामुळे अपात्रतेप्रकरणी दाखल ही याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ता प्रशांत नाईक यांना दावा रद्द करण्याचा अर्जावर खुलासा सादर करावा लागणार असून, याबाबत पुढील कामकाज २० रोजी होणार आहे. नाईक यांच्याकडून ॲड.सुधीर कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. तर मनपाकडून ॲड.आनंद मुजुमदार हे काम पाहत आहेत.