कुंदन पाटील,जळगाव : बडीशेप आणि जीऱ्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यंदा आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने बडीशोप १०० तर जीरे ५२० रुपये प्रतिकिलोने स्वस्त झाले आहे. तशातच मिरचीसह खडा (कच्चा) मसालाही १०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात आता झणझणीत फोडणी द्यायला सर्वसामान्यांनाही परवडणार आहे.
जीऱ्याचे उत्पादन घेण्यात गुजरात आणि राजस्थान आघाडीवर आहे. ८० टक्के उत्पादन या दोन्ही राज्यात घेतले जाते. तर बडीशोप उ. भारतात, गुजरात, कर्नाटक, पंजाब व राजस्थान येथे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी या दोन्ही पिकांना नैसर्गिक फटका बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट आली होती. त्यामुळे जीरे आणि बडीशेपच्या दरात मोठी वाढ झाली होती. यंदा मात्र आवक मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याने दर ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत.
मसाल्याला स्वस्ताईचा सुगंध :
यंदा मिरचीही दीडशे रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. गेल्यावर्षी काश्मीरसह अन्य गुंटूर (आंध्रप्रदेश) या भागात मोठा फटका बसला होता. यंदा उत्पादन वाढले असून मिरचीचा दर्जाही चांगला आहे. महाराष्ट्रात मात्र मोठा फटका बसला असला तरी यंदा मिरची प्रतिकिलोमागे १५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर कच्चा (खडा) मसाला प्रतिकिलोमागे १०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. वेलदोड्याच्या दरात मात्र काहीशी वाढ झाली आहे. मसाल्यातील अन्य घटक मात्र ‘जैसे थे’च आहेत.
गतवर्षाच्या तुलनेतील दर (किलो) -
पदार्थ-२०२३-२०२४बडीशेप-४०० ते ४४०-३२०-३४०जीरे-७२० ते ७६०-४५०-५००मिरची-६००-४५०मसाला-१५००-१४००