जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाबाधित महिला गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिच्या दोन्ही पायांना लकवा झाला. मात्र, फिजोओथेरपी विभागाच्या टीमने अथक प्रयत्न करून या महिलेला स्वत:च्या पायावर उभे केले. वैद्यकीय पथकाच्या यशस्वी उपचारानंतर त्या २८ वर्षीय महिलेला सोमवार, ५ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील सर्वसामान्य कुटुंबातील एका २८ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. ही महिला सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिच्यावर भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात सुमारे १३ दिवस उपचार चालले. मात्र प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्यामुळे तिला १३ मे रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या ठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शाल्मी खानापूरकर, डॉ. रोहन केळकर यांनी उपचार सुरू केले.
महिला १० दिवस व्हेंटिलेटरवर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही महिला सुमारे १० दिवस व्हेंटिलेटरवर होती. उपचारादरम्यान तिच्या दोन्ही पायांना पक्षाघात (लकवा) झाल्यामुळे तिला उभे राहण्यास त्रास होत होता. दोन्ही पायांना व्यंग आल्यामुळे तिला पुन्हा उभे राहता येईल की नाही याची शाश्वती कुटुंबातील सदस्यांनाही नव्हती. मात्र, वैद्यकीय पथकाने तिच्यावर उपचार सुरूच ठेवले. फिजिओथेरपी विभागाचे डॉ. अमित वाघदे आणि डॉ. नितीन महाजन यांनी तिच्यावर नियमित उपचार केले. तिला पायाचे व्यायाम प्रकार सांगून बरी होणार, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतर महिलेच्या पायांत सुधारणा होऊन गेल्या ५ दिवसांपासून स्वत:च्या पायावर उभी राहू लागली. या महिलेवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात आल्यामुळे महिलेला आर्थिक दिलासा मिळाला.
यांनी घेतले परिश्रम
दरम्यान, महिलेच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यामुळे तिला सोमवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी फळे आणि चिक्की देऊन रुग्णालयातून निरोप दिला. अधिष्ठाता डॉ. रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. विजय गायकवाड, डॉ. शाल्मी खानापूरकर, डॉ. रोहन केळकर, डॉ. गोपाळ ढवले, डॉ. अमित वाघदे, डॉ. नितीन महाजन आदींनी तिच्यावर उपचार केले. तसेच अतिदक्षता विभागातील अधिसेविका प्रणिता गायकवाड, इन्चार्ज परिचारिका राजश्री आढळे व कक्षातील परिचारिका संवर्गातील मयूरी सोनवणे, सोनाली नाईक, प्रिया जाधव, रवींद्र रावते, पवन रहाकळे, दिव्या साळुंखे, जितेंद्र सोनार, प्रतिमा गावीत, नीला जोशी आदींनी रुग्णास बरे करण्यासाठी सहकार्य केले.