सागर दुबे
पाळधी (जळगाव) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील सर्व शाळा, दुकाने बंद होती. रात्री धरणगाव पोलिसात दोन्ही गटातील शंभरहुन अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू करत ५८ जणांना अटक केली आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री पाळधी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून काही लोक जात असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात दोन गटात तुफान दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचासत समिती सदस्याच्या वाहनाची सुध्दा तोडफोड केला. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला होता. काहींनी तर दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून चोरून नेले. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता रात्री बघायला मिळाली.
गुन्हा दाखल, धरपकड सुरूपाळधीतील दगडफेकी प्रकरणी बुधवारी धरणगाव पोलिसात दोन्ही गटातील शंभरहून अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७, ३०७, ३५३, ३३२, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम ३,३७(१)(३)चे उल्लंघन आदी कलमान्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधीचे सपोनि प्रमोद कठोरे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयित निष्पन्न केले असून रात्री आणि सकाळी धरपकड कारवाई राबवून एकूण दोन्ही गटातील एकूण ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे केले. त्यावेळी काही दुकानदारांनी आमचा काही एक संबंध नसताना आमच्या दुकानांचे नुकसान केल्याची भावना व्यक्त केली.
३१ पर्यंत संचारबंदी लागू गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी बुधवार, दि. २९ मार्चच्या सकाळी ११ ते शुक्रवार, दि. ३१ मार्चच्या सकाळी ११ वाजेपर्यंत गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून बुधवारी गावातील सर्व शाळा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर शाळेतील परीक्षाही स्थगित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी धरगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते.