मुस्लिम बांधवाची घरी बसून प्रार्थना : चप्पल- बूट खरेदीसाठी बाजार उघडण्याची प्रतीक्षा
मुस्लिम बांधवाची घरी बसून प्रार्थना : चप्पल- बूट खरेदीसाठी बाजार उघडण्याची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर कोरोनाचे सावट आले असून, शासनातर्फे लावण्यात आलेल्या संचार बंदीमुळे घरात बसूनच नमाज अदा करावी लागत आहे. तसेच या संचारबंदीत शहरातील बाजारपेठा बंद असल्यामुळे कपडे, चप्पल, बूट, सुकामेवा आदी साहित्य खरेदीही रखडली आहे.
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला १४ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. संचार बंदी तसेच नियमांचे पालन करून धार्मिक विधी पार पाडले जात आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे मुस्लिम बांधवांची रमजान ईदच्या निमित्ताने होणारी खरेदी-विक्रीही थांबली आहे. दरवर्षी ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने कपडे, सुकामेवा साहित्य, अत्तर, चप्पल, बूट याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र, यंदा संचारबंदीमुळे खरेदी- विक्री थांबली असून, बाजारपेठ उघडल्यानंतरच ही खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दरवर्षी रमजान ईदचा उत्सव म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मुस्लिम बांधव एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मात्र, कोरोनामुळे हा आनंद काहीसा कमी झाला असल्याचेही काही मुस्लिम बांधवांनी सांगितले.
इन्फो :
धार्मिक विधिला पाच जणांची परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार मशिदीमध्ये होणारी नमाज पठाण आणि अन्य धार्मिक विधीसाठी शासनाने पाच जणांना परवानगी दिली आहे. त्या नियमांचे पालन करून घरातच नमाज पठण करत असल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले.
इन्फो :
विविध फळांची घरपोच मिळतेय डिलिव्हरी
रोजा काळात धरलेला उपवास सोडण्यासाठी विविध फळांसह अन्य खाद्यपदार्थ आवश्यक असतात. मात्र, कोरोनामुळे घराबाहेर खरेदीसाठी बाहेर पडणे शक्य नसल्याने समाजातील काही व्यावसायिक घरपोच उपवासाचे साहित्य आणून देत आहेत. परिणामी यामुळे बाहेर जाण्याचा त्रास वाचला असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
आता बाजार उघडण्याची प्रतीक्षा
संचार बंदीमुळे शहरातील बाजारपेठ बंद असल्याने, नवीन कपडे व इतर वस्तुंची खरेदी थांबली आहे. त्यामुळे जेव्हा दुकाने उघडतील, तेव्हाच खरेदी होणार असल्याचे हजरत बिलाल ट्रस्टचे अध्यक्ष अकिल पहेलवान यांनी सांगितले. तर गेल्या वर्षीही अशाच पद्धतीने ईद साठीची खरेदी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
इन्फो :
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व मुस्लिम बांधव शासनाच्या नियमांचे पालन करून घरातच नमाज पठण व इतर धार्मिक विधी पार पाडत आहेत. संचार बंदीनंतरही मुस्लिम बांधवांनी बाजारात गर्दी न करता, परिस्थिती पाहून घराबाहेर पडणे गरजेचे आहे.
फारुख गुलाम जिलानी बिबा