कोरोनामुळे गाळेधारकांवर कारवाई करू नका
जळगाव : गेल्या कित्येक दिवसापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले मार्केट आता जेमतेम सुरू होत असताना महानगरपालिकेने येत्या सोमवारपर्यंत थकबाकी भरा अन्यथा गाळे सील केले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. कोरोनामुळे सर्व व्यापारी, कामगार अगोदरच हवालदिल झाले असताना मनपाने कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष (आठवले गट) अनिल अडकमोल यांनी केली आहे.
गाळेधारकांच्या बंदला केमिस्ट संघटनेचा पाठिंबा
जळगाव : मनपाच्या धोरणाविरुद्ध गाळे धारकांनी पुकारल्याने बंदला डिस्ट्रिक्ट मेडिसिन डिलर्स असोसिएशनने पाठिंबा दिला असून ६ मार्च शहरातील सर्व केमिस्ट बांधव दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार आहे. गाळेधारकांमध्ये ५० ते ६० केमिस्टदेखील असून त्यांच्यासह सर्वच व्यापाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, तेजस देपुरा, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये गाळेधारकांच्या बंदला संघटनेने पाठिंबा जाहीर केला. कोरोनाचा काळ असल्याने कडकडीत बंद न ठेवता ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत औषधी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या चौकशीची मागणी
जळगाव : संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या चौकशीची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेने केली आहे. या योजनेत अमळनेर तालुक्यातील ३९ लाभार्थ्यांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असून त्यांच्याकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याची तक्रार संघटनेने महसूल विभागाकडे केली आहे.