लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आदेश काढण्यात आले आहे. १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान या निवडीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींची विशेष सभा होणार आहे. या कालावधीत प्रत्येक तालुक्यांच्या ग्रामपंचायतींचा कार्यक्रम तहसीलदारांकडून ठरविला जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तसे आदेश सर्व तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान, या आदेशामुळे आता प्रत्येक गावात तसेच इच्छुकांना सरपंच निवडीविषयी असलेली उत्सुकता आता संपली आहे. मात्र यामुळे आता एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या ठिकाणी सहलींचे आयोजन होण्याचे शक्यताही वर्तविली जात आहे.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक घेण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली. त्यानंतर सरपंचपद आरक्षण काढण्यात आले होते. त्यानुसार आता सरपंच निवडीसाठी १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान सरपंच निवड होणार आहे.
एकापेक्षा जास्त सरपंचपदाची निवडणूक असल्यास विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक
यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सभेची तारीख निश्चित करण्याविषयी सूचित केले आहे. या सभेत सरपंच, उपसरपंच निवड करण्यासाठी सदस्यांना पहिल्या सभेचा अजेंडा देण्यासाठी ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात यावी, असे कळविले आहे. यात एकाच ग्रामसेवकाकडे एकाच तारखेस एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक असल्यास विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे कळविण्यात आले आहे. ही सभा ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज ज्या ठिकाणी चालते, तेथेच ही सभा घ्यायची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यात सदस्याला सभेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर अजेंडा द्यावा लागणार आहे.
अध्यासी अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी आठ दिवस कार्यक्रम
जिल्ह्यात तब्बल ७७९ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांची निवड करायची आहे. यात सर्वाधिक ९६ ग्रामपंचायतीचा पाचोरा तालुक्यात समावेश आहे. अशाच प्रकारे सर्वच तालुक्यात ही संख्या अधिक असल्याने त्या तुलनेत अध्यासी अधिकाऱ्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी १० ते १८ फेब्रुवारी असा सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
सरपंच, उपसरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
तालुका ग्रामपंचायतींची संख्या
जळगाव ४२
जामनेर ७२
धरणगाव ४७
एरंडोल ३७
पारोळा ५८
भुसावळ २६
मुक्ताईनगर ५१
बोदवड २९
यावल ४६
रावेर ४८
अमळनेर ६७
चोपडा ५२
पाचोरा ९६
भडगाव ३३
चाळीसगाव ७५
एकूण ७७९
या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवड १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणार.
सरपंच, उपसरपंच निवडीचे असे होणार कामकाज
- सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारणार
- दुपारी २ वाजता विशेष सभेचे कामकाज सुरू
- गणपूर्तीसाठी सदस्य संख्येच्या एक व्दितीयांश सदस्यांची उपस्थिती आवश्यक.
- कोरम पूर्ण असल्यास नामनिर्देशनपत्राची छाननी
- अध्यासी अधिकारी सूचक पदाच्या उमेदवारांचे नावे सदस्यांसमोर वाचून दाखवणार
- माघारीसाठी पाच मिनिटांचा वेळ
- माघारीनंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक
एक सदस्य बिनविरोध येऊनही नशिराबाद ग्रामपंचायतीचा समावेश नाही
जळगाव तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यासाठी या ग्रामपंचायतसाठी उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांनी सामूहिक माघार घेतली होती. मात्र येथे एक सदस्य बिनविरोध ठरला. मात्र या ठिकाणी गणपूर्ती होणे शक्य नसल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रमही जाहीर होऊ शकलेला नाही.