जळगाव : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून लागू करण्यात आलेला प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गाच्या पसंतीवर आधारीत श्रेयांक पध्दती (सीबीसीएस) अभ्यासक्रम हा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुध्दा जशाचा-तसा लागू करण्यात आला आहे. या ठरावाला नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने मान्यता दिली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गांकरिता 'पसंतीवर आधारित श्रेयांक पधती' लागू केली आहे. नंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये तृतीय वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गाचे विद्यार्थी पदवी घेऊन उत्तीर्ण होणार आहे. या अनुषंघाने, नैसर्गिकरित्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून अभ्यासक्रम बदलणार होता़ परंतु, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये एम.एस्सी, एम.ए, एम.कॉम भाग १, एमबीए भाग १, एमएमएस कॉम्प्युटर भाग १, एमएमएस पर्सनल मॅनेजमेंट भाग १ तसेच एमबीए भाग १, एमएसडब्ल्यू भाग १ वर्गांचे अभ्यासक्रम पसंतीवर आधारीत श्रेयांक पध्दतीने लागू करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रम पुनर्रचना पुढच्या वर्षी (२०२२-२३) करावी, अशी शिफारस विद्यापीठातील प्रभारी अधिष्ठातांनी एकमताने केली होती. नंतर ही शिफारस २७ मे रोजी झालेल्या विद्या परिषदच्या ऑनलाइन सभेत सुध्दा विचारार्थ ठेवण्यात आली होती. दरम्यान, या ठरावाला आता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गाच्या पसंतीवर आधारीत श्रेयांक पध्दतीचा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षात सुध्दा कायम ठेवला जाणार आहे, तसे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.