जळगाव : घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान (सबसिडी) मिळविण्यासाठी केवासी प्रक्रिया केल्यानंतरही अनेक ग्राहकांना अनुदान मिळण्यासाठी येणाºया अडचणी अद्यापही कायम असून यासाठी ग्राहकांना फिराफीर करावी लागत आहे. यामध्ये ज्या खात्याशी आधार लिंक आहे, ते बंद केले व दुसरे खाते क्रमांक गॅस एजन्सीला दिले तरी त्याचा फायदा होत नसल्याने बंद खात्याचे आधार लिंकिंग रद्द होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.घरगुती गॅस सिलिंडरवर अनुदान दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलिंडर घेताना विनाअनुदानीत सिलिंडरची रक्कम अर्थात सिलिंडरची मूळ किंमत ग्राहकांना गॅस वितरकांना द्यावी लागत आहे. यावर अनुदान मिळविण्यासाठी सरकारने प्रत्येक ग्राहकाला केवायसी प्रक्रिया सक्तीची केली. त्यामध्ये लाभार्थी ग्राहकाला त्यांचे बँक खाते क्रमांक तसेच रहिवासी पुरावा, आधार कार्ड यांची माहिती गॅस एजन्सीकडे सादर करावी लागली. त्यानुसार जो बँक खाते क्रमांक गॅस पुरवठ्याशी जोडला गेला त्या खात्यात ही रक्कम जमा होऊ लागली.बँकांमध्ये आधार लिंकिंगबँकांमध्ये असलेल्या प्रत्येक खात्यास आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केल्यानंतर काही जणांनी ते केले मात्र अनेक जणांनी आधार लिंकिंग न केल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास अडचणी येऊ लागल्या.गॅस अनुदान मिळविण्यासाठी ग्राहकाने जो बँक खाते क्रमांक दिला आहे, त्या खात्याशी आधार लिंक नसल्यास गॅस अनुदान ग्राहकाच्या त्या खात्यात जमा न होता गॅस ग्राहकाने जो बँक क्रमांक गॅस एजन्सीला दिलेला नाही मात्र त्या खात्याशी त्याचे आधार लिंक असेल तर त्या दुसºया खात्यावर गॅस अनुदान जमा होते.ज्या खात्याशी आधार लिंक आहे, त्यामध्येच गॅस अनुदानाची रक्कम जमा होत आहे. मात्र अनेक ग्राहकांनी पूर्वी बँक खात्याशी आधार लिंक केलेले आहे व आता ते खाते बंद केले आहे, अशा ग्राहकांनाही अनुदान मिळण्यासाठी अडचणी येत आहे. कारण आधार कार्डवर आधारीत गॅस अनुदान योजनेमुळे जे बँक खाते बंद आहे, मात्र त्याच्याशी आधार लिंकिंग आहे, असे खाते आधार कार्डमुळे गॅस अनुदानासाठी ग्राह्य धरले जात आहे. मात्र बँक खातेच बंद असल्याने त्यात ती रक्कम जमा होत नाही, अशी दुसरी समस्या यात उद््भवली आहे. त्यामुळे बँकांमध्ये ग्राहकांनी बंद केलेल्या खात्याचे आधार लिंकिंग रद्द होणे गरेजेचे असल्याचे सांगितले जात आहे.गॅस अनुदान मिळविण्यासाठी प्रत्येक ग्राहकाचे बँक खात्याशी आधार लिंक असणे गरजेचे आहे. या सोबतच जे खाते बंद आहे, त्यांच्याशी आधार कार्ड लिंक असते. त्यामुळे अडचणी येतात. यासाठी बँकेतील बंद खात्याशी आधार लिंकिंग रद्द होणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना अनुदान मिळण्यास अडचणी येणार नाही.- अजय ठोंबरे, व्यवस्थापक, गॅस एजन्सी.
गॅस अनुदानासाठी ग्राहकांच्या फेऱ्या थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:42 AM