जळगाव : सायबर पोलीस ठाण्याचा गाडा हा १६ कर्मचारी व २ अधिकारी अशा एकूण १८ जणांवर हाकला जात आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या, दाखल गुन्हे, तक्रारी याचा विचार करता हे मनुष्यबळ अगदी तोकडे असून त्यामुळे तब्बल ५४ तक्रारी तपासाविना पडून आहेत. वर्षभरात १९ गुन्ह्यांचा तपास करुन ते निकाली काढण्यात आलेले आहेत.
पोलीस दलाच्या सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आता जिल्ह्यात सायबर सेलकडे ५४ तक्रारी शिल्लक आहेत. त्यात भाग ५ चे ३१ तर भाग ६ चे १४ प्रकरणे आहेत. निकाली निघालेल्या तक्रारीत भाग ५ चे १० तर भाग ६ च्या ९ गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्याची स्थिती व गुन्ह्यांचे प्रकार पाहता अजून किमान २ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांची गरज आहे. सहायक किंवा उपनिरीक्षक, हवालदार, नाईक व कॉन्स्टेबल अशा मनुष्यबळाची गरज आहे. पोलीस ठाण्याचा निर्मिती झाली तेव्हा नेमके किती मनुष्यबळ असावे याचे धोरणच ठरलेले नाही. सद्यस्थितीत पोलीस निरीक्षक बळीराम हिरे या विभागाचे प्रमुख असून त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे दोन्हीकडे काम सांभाळताना प्रभारी अधिकाऱ्याची कसरत होते. सायबर पोलीस ठाण्याकडे येणाऱ्या तक्रारी या सोशल मीडिया, ऑनलाईन फसवणुकीच्याच अधिक असल्याने त्याचे आरोपी देखील परप्रांतीय असल्याने कामाचा व्याप अधिकच वाढतो.
सोशल मीडियाचेही ८१ गुन्हे
सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी २०१९ मध्ये ५८ तर २०२० मध्ये २३ असे एकूण ८१ गुन्हे सायबर पोलिसांकडे दाखल झाले आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे निकाली निघालेले आहेत. २०२० या वर्षात लॉकडाऊन असल्याने या गुन्ह्यांची संख्या कमी होती. २०१९ मध्ये अशा गुन्ह्यात १६ कोटी ७७ लाख ९४३ रुपयांची फसवणूक झाली होती तर १० लाख ६५ हजार ३०० रुपये हस्तगत करण्यात आले होते. २०२० मध्ये ४१ लाख ६७ हजार ७३६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती तर त्यापैकी ६ लाख १० हजार रुपये वसूल झाले होते.
सायबर सेलकडील एकुण मनुष्यबळ -१८
अधिकारी -२
कर्मचारी -१६
सोशल मीडियाच्या दाखल तक्रारी
जानेवारी- २
फेब्रुवारी- ०
मार्च - २
एप्रिल - ४
मे - १
जून-१
जुलै-४
ऑगस्ट-२
सप्टेंबर- २
ऑक्टोबर -०
नोव्हेंबर-३
डिसेंबर-२
ऑनलाईन फ्रॉडच्या सर्वाधिक तक्रारी (बॉक्स)
सायबर पोलिसांकडे सर्वाधिक तक्रारी या ऑनलाईन फ्रॉडच्या आलेल्या आहेत. ओटीपी किंवा आधारकार्ड क्रमांक विचारुन बँकेतून पैसे परस्पर वळविण्याच्या या तक्रारी आहेत. त्यातील आरोपी हे खास करुन झारखंड, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातीलच आढळून आलेले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर यात जास्त झालेला आहे.
कोट..
सायबर पोलीस ठाण्यात खास करुन सोशल मीडियाच्याच जास्त तक्रारी असतात. बँकीग फसवणूक, नोकरीसाठी फसवणूक, विमा आदी प्रकाराच्या तक्रारींची संख्या जास्त आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वच आरोपी परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेचे अकाऊंट हॅक करुन २५ लाखाची ऑनलाईन लूट करणारा आरोपी दिल्लीचा निष्पन्न झाला. त्याला बेड्या ठोकण्यात यश आले. दाखल गुन्हे लगेच निकाली काढले जातात. आरोपी परप्रांतातील असल्याचे विलंब होतो.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे