लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात एक आवर्तन सोडण्यात आल्याने ममुराबादसह परिसरातील गावांना टंचाईच्या काळात दिलासा मिळाला आहे.
तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण झाले झाल्याने हतनूर धरणाचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर हतनूरच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ दलघमी पाणी सोडण्यात आले असून, ते बुधवारी सकाळी नांद्रा गावापर्यंत पोहोचले.
ममुराबादसह परिसरातील नांद्रा, खापरखेडा, तुरखेडा, आवार, विदगाव आदी गावांच्या पाणी योजना तापी नदीवर अवलंबून आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः मे महिन्यात तापीचे पात्र कोरडेठाक पडल्यानंतर संबंधित सर्व गावांना दरवर्षी तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही तीच परिस्थिती ओढवलेली असताना, पाणी योजनांचे पंप दिवसातून बंद राहत होते. त्याबद्दल ‘लोकमत’मध्येही काही दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमधील सरपंच तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी हतनूरचे एक आवर्तन तापी नदीपात्रात सोडण्यासाठी निवेदन देऊन पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन पाण्याचे आवर्तन सोडण्याविषयी आदेश दिले. त्यानुसार यावल तालुक्यातील सूर नदीद्वारे हतनूरच्या उजव्या कालव्याचे पाणी जळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पात्रात सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. देऊळवाडे गावाजवळ तापीच्या पात्रात सूर नदीचे पाणी येऊन मिळते. तेथून नांद्रा गावापर्यंत बुधवारी सकाळपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहोचले. टंचाईग्रस्त गावांना त्यामुळे काही दिवस दिलासा मिळू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली.
----
फोटो कॅप्शन - ममुराबाद सामूहिक योजनेसाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी तापी नदीच्या पात्रात हतनूरचे पाणी पोहोचले. (जितेंद्र पाटील)