ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे वृत्त 'लोकमत'ने नुकतेच प्रकाशित केले. याशिवाय ममुराबाद ग्रामपंचायतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन हतनूरमधून सूर नदीला जोडलेल्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.
हतनुर धरणातून कालव्याद्वारे किलोमीटर ३१ एस्केपमधून सूर नदीद्वारे ममुराबाद व पाच गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासाठी हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी सोडावे लागणार आहे. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक कडा जळगाव यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याचे आदेशित केले आहे. सद्यस्थितीत ममुराबाद व पाच गावांमध्ये अपुऱ्या जलस्रोतांमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, हतनूरचे पाणी सोडल्यास सामूहिक योजनेतील गावे व पंचक्रोशीतील इतर गावांना पावसाळ्यापर्यंत दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, कार्यकारी अभियंता बेहेरे यांनी सूर नदीद्वारे हतनूरचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.