लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : हाडं गोठवणाऱ्या गारठ्यात तिघांनी पहाटे ६ वाजता औरंगाबादच्या क्रांती चौकातून देवघाटकडे जाण्यासाठी सायकलींना पायडल मारले. पुढे २४ तास त्यांच्या सायकलीचे चाक फिरतच होते. लक्ष्य होते २७ तासांचे. मात्र चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार करून बीआरएम स्पर्धेत आपल्या यशाची लखलखीत मुद्रा कोरली. ४५ वर्षीय टोनी खैरातीलाल पंजाबी, ५९ वर्षीय रवींद्र पाटील आणि ४२ वर्षीय अरुण हिरामण महाजन हे तिघे हौशी सायकलिस्ट. दरदिवशी पहाटे उठून सायकलफेरी आवर्जून करतातच. हौशेला स्पर्धेचा आयामही त्यांनी दिला आहे. शनिवारी त्यांनी जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे आयोजित ४०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन लक्ष्य साध्य केले. या तिघांवरही काैतुकाचा वर्षाव होत आहे.
टार्गेट ६०० किमीचे, १३ला सायकली धावणार
१३ रोजी ६०० किमी अंतराची स्पर्धा होत असून यासाठी ४० तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तिघेही सायकलवीर सध्या यासाठी कसून सराव करीत आहे. धुळे ते टिकरी (मध्य प्रदेश) पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. पुन्हा तेथून धुळे येथे परत यायचे, असे स्पर्धेचे टार्गेट आहे.
औरंगाबाद-देवघट ते मांजरसुंभा परत औरंगाबाद
शनिवारी कडाक्याच्या थंडीत स्पर्धेतील सायकलवीरांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. औरंगाबादहून देवघट ते मांजरसुंभा आणि परत औरंगाबाद, असे एकूण ४०० किमीचे अंतर २७ तासात पार करावयाचे होते. चाळीसगावच्या या तिघा सायकलवीरांनी हे अंतर २४ तासातच पूर्ण केले. यात पूर्ण रात्रीची १२ तासही त्यांची सायकल स्पर्धेच्या अंतिम लक्ष्यापर्यंत झेपावत होती. थंडीच्या गारठ्याचे कडे भेदत त्यांचे प्रत्येक पायडल कसोटी पाहणारे ठरले. मात्र तिघांची जिद्द सायकलच्या चाकाप्रमाणेच न थांबता फिरत राहिली. रविवारी पहाटे ६ वाजता त्यांनी पुन्हा क्रांती चौक गाठला. त्यावेळी तिघांच्या नावापुढे यशाची पताका रोवली गेली होती.
२०० व ३०० किमी स्पर्धेतही यशाचे तोरण
टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन हे दरदिवशी ५० किमी सायकल चालवतात. ४०० किमी स्पर्धेच्या आधीदेखील २०० किमीच्या धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर हे लक्ष्य त्यांनी साडेनऊ तासात गाठले. यासाठी साडेतेरा तासांंचा अवधी निर्धारीत केला होता.
यशाचे तोरण
धुळे ते नाशिक आणि नाशिक ते धुळे हे ३०० किमी अंतर १५ तासात पार करून या स्पर्धेतही तिघांनी यशाचे तोरण बांधले. टोनी पंजाबी हे व्यवसाय करतात. रवींद्र पाटील हे स्टेट बँकेच्या कृषी शाखेत गाडी चालक असून अरुण महाजन पिलखोड येथील पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात.
सायकलफेरी पर्यावरणस्नेही आहे. नियमित सायकल चालविल्याने शरीर बळकट होते. इम्युनिटी वाढते. गुडघ्यांचेही आजार उद्भवत नाही. शरीराचे मसल्स बिल्ड होतात. दिवसभर प्रसन्न वाटते. नियमित सायकल चालविण्याचे असे अनेक फायदे आहेत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजनसायकलवीर, चाळीसगाव