आधार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वाचनालयाचे उद्घाटन
जळगाव - राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आधार ज्येष्ठ नागरिक संघ संचलित कै.नामदेव पाटील वाचनालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शांता वाणी, उदय पाटील, गजानन देशमुख, सुनील गरूड, प्रतिभा देशमुख, रामलाल सोनी, अशोक पाटील संदेश भोईटे आदी उपस्थित होते.
शिवाजीनगरातील उघड्या विहिरीवर बसविली जाळी
जळगाव - शिवाजीनगर हुडको भागातील शिवशक्ती नगरातील विहिरीवर या भागातील अनेक नागरिकांना पाणीपुरवठा होतो. मात्र, या उघड्या विहिरीत शेळ्या व इतर प्राणी पडत असल्याने पाणी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत दारकुंडे यांनी स्वखर्चाने विहिरीवर जाळी बसविली आहे.
युनिट प्रमुखांना नोटीस
जळगाव -प्लास्टिक कारवाई करून जप्त केलेला माल पुन्हा विक्री केल्याची तक्रार एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी केली होती. याप्रकरणी मनपा सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी तीन युनिट प्रमुख व एका मुकादमला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे तसेच खुलासा सादर न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारादेखील सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे.
कांचन नगरभागात एलईडी बसविण्यास सुरुवात
जळगाव - शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील कांचननगर, पवननगर, चौघुले प्लॉट, आसोदा रोड परिसरात एलईडी बसविण्याचा कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक किशोर बावीस्कर, विनोद कोळी, बंटी गवळी, गणेश आढवे, मनोज आटवाल, संतोष शिंदे, देविदास सोनार आदी उपस्थित होते.