अमित महाबळ
जळगाव : विद्यापीठाकडून राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा गुण अथवा समतूल्य क्रेडीट देण्याच्या प्रस्तावाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.
कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, व्यवस्थापन परिषेदेची बैठक झाली. आविष्कार स्पर्धेसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यादेश १६३ अंतर्गत १० गुण दिले जातात. आता या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ संघाकडून राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दहा गुण अथवा समतूल्य क्रेडिट अध्यादेश १६३ अंतर्गत दिले जाणार आहेत. तसेच अविष्कार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना (मेंटॉर) प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थी हिताच्या या निर्णयामुळे अविष्कार स्पर्धेतील गुणवत्ता वाढीला मदत होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
... तर स्वतंत्र गुण नाहीतमात्र एकच विद्यार्थी रासेयो, क्रीडा, अथवा आविष्कार स्पर्धेत सहभागी असेल तर स्वतंत्र वेगवेगळे गुण मिळणार नाहीत. तिन्ही उपक्रमातील सहभाग एकत्रच धरला जाऊन दहा गुण मिळेल.
या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस.टी. भुकन, प्रा. एस. आर. कोल्हे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. संदीप पाटील (ऑनलाईन उपस्थिती), डॉ. संतोष चव्हाण, डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील हे उपस्थित होते.