लोकमत न्यूज नेटवर्क
हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने मुले घरात कंटाळवाणी झाली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे. यामुळे मुले कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई-बाबांना म्हणतात, ‘कोरोना केव्हा जाणार आणि शाळा केव्हा सुरू होणार? बाबा, मला खेळायला जायचं. आई, मला शाळेला जायचं... मुलांच्या या म्हणण्यावर आई-बाबा मात्र निरुत्तर होत आहेत.
मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालपणाच्या जीवनातील अविभाज्य अविस्मरणीय क्षण आहेत; परंतु कोरोना काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. कोठे गावालाही जायला मिळाले नसल्याने नातेवाइकांसह मामाचे गावही पोरके झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत, शालेय मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होण्याची शक्यता दर्शविल्याने मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरची परिस्थिती वाईट आणि भीतीदायक आहे तर घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, चिडचिडी, भांडकुदळ, हट्टी बनली आहेत. काही मुलांना तर मोबाइलशिवाय करमतच नाही. ते आईबाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.
पालकांची भूमिका महत्त्वाची
आपल्या पाल्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. पालकांना पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शकांच्या भूमिका साकाराव्या लागत आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका या वेळेस फारच महत्त्वाची ठरत आहे. त्यातच सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने पालक शेतात मोलमजुरीसाठी आणि त्यांची मुले घरी त्यामुळे एकटे एकटे राहून मुलांची कोंडी होत आहे.
पालक प्रतिक्रिया
मुलांसाठी शाळा बंद असल्याने मुले खूपच चिडचिडी बनली आहेत. दिवसभर मोबाइलशी खेळत असतात. मी गवंडी कामाला बाहेर जातो. पत्नी शेतात कामाला जाते. त्यामुळे मुले रिकामी भटकत असतात. तलावावर जातात. वाटेल तिथे फिरतात. लक्ष द्यायला घरी कोणी नसते. हताश झाली आहेत. ‘बाबा, माझी शाळा कधी सुरू होणार?’ असे विचारतात.
- सय्यद इरफान सय्यद रसूल, पालक, गवंडी कामगार