जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील मंगल नारायण पाटील यांच्या शेतातील विद्युत खांबांचा तारांचा झालेला शॉर्टसर्किटमुळे चार बिघे क्षेत्रातील दादर जळून खाक झाली आहे. ऐन काढणीवर असतानाच ही दुर्घटना झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत आयुक्तांना निवेदन
जळगाव : शहरातील निमखेडी शिवार परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी महापालिकेकडून कोणतेही उपाययोजना होत नसल्याने त्वरित कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाटिकाश्रम निमखेडी शिवारातील रहिवासी यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी साहेबराव माळी, दीपक गुंजाळ, दिगंबर पाटील, भारती मराठे, मीना देवरे, हेमलता चौधरी, राणी मेटकर, स्मिता कोष्टी, संध्या मिसे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.
गतिरोधक बसविण्याची मागणी
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे फाट्यावर मुख्य रस्त्यालगत गतिरोधक नसल्याने याठिकाणी अपघातांची शक्यता वाढली आहे. तसेच या ठिकाणी शाळा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या ठिकाणी गेल्या आठवडाभरात लहान-मोठे दोन अपघात झाले आहेत.
सुरत रेल्वे गेटवर पुन्हा वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील दूध फेडरेशनजवळील सुरत रेल्वे गेटवर गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धान्याची वाहतूक करणारी ट्रक अचानक बंद पडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यातच रेल्वे गेटदेखील बंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अर्धा तासानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.