लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसींमध्ये सध्यास्थितीत दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही घटून गुरूवारी एकत्रित लसीकरणाच्या केवळ ११ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असून यापेक्षा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याच अधिक असल्याचे समोर आले आहे.
१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद असताना ४५ वर्षावरील व आरेाग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांचे अद्यापही पहिले डोस अधिक प्रमाणात बाकी असल्याचे यातून समोर येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोविशिल्डचे १२ हजार १७० डोस शिल्लक असून त्यातील ४२१० डोस हे जळगावातील केंद्रावर आहे तर कोव्हॅक्सिनचे शहर वगळता अन्य ठिकाणी ८०० डोस शिल्लक आहेत. गुरूवारी ३८३० लोकांनी पहिला तर ५०० लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.