कळमसरे, ता.अमळनेर : दुष्काळाची दाहकता व दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणी पातळी यामुळे शेतीसाठी पाण्याचे विविध स्रोत आटले आहेत. या स्थितीत पुढील नियोजनाच्या दृष्टीने खेडी बद्रूक येथील ग्रामस्थांनी जलसिंचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसे धरणावरील माती बांधसाठी सुमारे तीन हेक्टर पडीक क्षेत्रातून गौण खनिज पुरवून, १५ फूट खोल, तीन हेक्टर लांब असा विशाल पाझर तलाव बांधण्याचे काम सुरू केले आहे.पाडळसे धरणाचे काम करणा-या ठेकेदाराने खेडी बद्रूक गावाआधी असलेल्या कळमसरे गावाच्या हरषा तलावाचे खोलीकरण करून माती बांधसाठी गौण खनिज घेण्याचे ठरविले होते. मात्र, काहींनी ठेकेदाराला मज्जाव केला. खेडी बद्रूक ग्रामस्थांनी ठेकेदाराशी तत्काळ संपर्क साधून गावालगतच्या पडीक तीन हेक्टर जमिनीतून गौण खनिज पुरविण्यास व त्या जागी पाझर तलाव करून देण्यास समंती दर्शविली. खेडीच्या ग्रामस्थांनी विधायक कामासाठी एकजूट होऊन, चालून आलेल्या संधीचे सोने करीत असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.या तलावाचे अत्याधुनिक पोकलँंड, जेसीबी मशिनद्वारे खोदकाम सुरू असून, ठेकेदार डंपरच्या सहाय्याने कळमसरे गावावरून पाडळसे धरणावर गौणखनिज वाहून नेत आहे.वासरे, खेडी व खर्दे या तीन गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ज्योत्स्ना प्रमोद पाटील यांनी ग्रामसभा बोलवून धरण ठेकेदाराला खेडी शिवारातून गौण खनिज उचलण्याची सर्वसंमतीने परवानगी दिली. शिवाय वासरे शिवारात ठेकेदाराकरवी नाला खोलीकरणासंबंधीची कामे करवून घेतली. यंदा पावसाळ्यात पाण्याचा साठा होऊन त्याद्वारे परिसरातील शेतजमिनीला याचा फायदा होऊन टँंकरमुक्ती होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या गावांना सिंचनाचा फायदातलावाचे काम पूर्ण झाल्यास वासरे व चौबारी गावांकडून वाहत येणारे दोन्ही नाले या तलावात अडविले जाऊन, मोठ्या प्रमाणात जलसाठा होईल. परिणामी खेडी, वासरे, खर्दे, गोवर्धन व कळमसरे या सीमेवरील गावांच्या बंद पडलेल्या विहिरींना पाणी येऊन सिंचनाचा लाभ होईल, असे जयवंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.