लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील पाच तालुक्यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार ५५८.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक १ हजार १३८.६० हेक्टर क्षेत्राचे अमळनेर तालुक्यात नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात झालेल्या अतिपावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळेच जलस्रोतामध्ये चांगले पाणी असल्याने रब्बी हंगाम चांगला येणार अशी अपेक्षा असतानाच या हंगामातही अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. यामध्ये ६ ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव या पाच तालुक्यातील १ हजार ५५८.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
गव्हाचे मोठे नुकसान
पाच तालुक्यातील ५१ गावांमधील तीन हजार ९१८ शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, मका, कांदा या पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक ६१२.६० हेक्टरवरील गव्हाला फटका बसला आहे. त्या खालोखाल ५०८ हेक्टरवरील ज्वारी, २४१ हेक्टरवरील मका, २२१ हेक्टरवरील हरभरा, पाऊन हेक्टरवरील बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका एकूण नुकसान
जळगाव १५.००
चाळीसगाव २२.००
अमळनेर ११३८.६०
पारोळा ३८३.००
भडगाव २५.१५
एकूण १५५८.६०