अमळनेर : परिसरात ज्वारी व मका पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवला असून ती हातची गेली आहेत. शासनाने नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जुनोने येथील शेतकरी भगवान दयाराम पाटील यांनी तक्रार केली आहे की, परिसरात ७० ते ७५ टक्के ज्वारी व मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कणसे पोकळ होऊन सडू लागली आहेत. ५ वर्षाच्या दुष्काळातून समाधानकारक पावसाने सावरले होते. मात्र लष्करी अळीने पुन्हा शेतकऱ्यांंवर संकट आणले आहे. अधिकाºयांंनी पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.याबाबत कृषी साह्ययक दीपक चौधरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांनी उशिराने मका व ज्वारीची लागवड केली आहे त्यांच्या पिकांवर आळीचा प्रादुर्भाव जास्त आहे.ज्यांनी आधी लागवड केली होती त्यांना कृषी विभागाने प्रोक्लेन व निमार्क फवारणी करावयास सांगितली होती. त्यांची पिके सुरक्षित आहेत. ज्यांनी मक्याचा विमा काढला असेल त्यांना विमा मंजूर होऊ शकतो.