जळगाव : तालुक्यातील आसोदा शिवारात इलेक्ट्रीक तारांच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील काढणीला आलेला गहू जळून नुकसान झाल्याची घटना ३० मार्च रोजी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मधुकर दोधू सरोदे (वय ६४, रा. महाजन वाडा, असोदा, ता. जि. जळगाव) यांची आसोदा शिवारात शेत गट नंबर १५ / ९१ मध्ये शेती आहे. शेतात त्यांनी गहू पेरला होता. ३० मार्च रोजी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या तारांचा एकमेकांशी संपर्क आल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गहू जळून खाक झाला. यात अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मधुकर सरोदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहेत.