महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने कांदा उत्पादक व कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच महिनाभरापूर्वी दडी मारून बसलेल्या पावसाने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. परिसरात ५० टक्के कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याचे पेरलेले बियाणे (रोप) ही अतिपावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांना आता नवीन कांदा लावण्यासाठी नवीन बियाणे पेरणी करावी लागणार आहे. अतिपावसामुळे कापसाच्या कैऱ्याही सडल्या असून त्या कैऱ्या तोडून त्यातून ओला कापूस काढण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळेनासा झाला आहे. अजून दोन दिवसांनी पुन्हा पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल काढण्यासाठी धडपड सुरू आहे.
मका पिकांवर खील सुरुवातीपासून लष्करी अळ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेही पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कापूस पिकावर लाल रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या धुक्यामुळे जून महिन्यात लागवड झालेले कपाशी पिकांची फुलफुगडी गळून पडल्याने कापसाचे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे.
कांद्याचे निम्मे नुकसान
सध्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आता सुरू असलेली कांदा लागवड ही मोठ्या संकटात आहे. महिन्यापासून लागवड केलेल्या कांदा पिकाला तापमानच मिळत नसल्याने पावसामुळे जमिनीत कांदा परिपक्वच होत नसल्याने काही भागात नांगर फिरविण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. कांदा लागवडीसाठी लागलेला मजुरी खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. निसर्गाच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे पाठ सोडता सोडत नसल्याने आधीच रासायनिक खते, महागडी बियाणे, मशागतीची मजुरी यामुळे शेतकरी अधिक खचला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवत आहे.
परिसरात सोयाबीनचा पेराही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची मुदतही संपली असून सोयाबीनच्या झाडावर पाला शिल्लक नसल्याने फक्त सोयाबीन शेंगाच शिल्लक आहे. त्यामुळे अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची शक्यता आहे.