जळगाव : मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये फक्त ३५३.६८ दलघफू म्हणजेच १२.४९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.७१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा तर मध्यम प्रकल्पांमध्ये २.९४ टीएमसी आणि लघु प्रकल्पांमध्ये १.११ टीएमसी असा एकूण २१.७६ टीएमसी उपयुक्त साठा आहे.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. अभोडा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम तर ९६ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजपर्यंत ४३.१७ टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये ५०१.५२ दलघमी म्हणजेच १७.७१ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.४१ टीएमसी, गिरणा १२.९४ टीएमसी, तर वाघूर धरणात ३.३५ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यावर्षी आजपर्यंत हतनूर धरण क्षेत्रात ५४३ मिमी, गिरणा धरण क्षेत्रात ३१६ मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात ६४४ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद आहे.जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये ८३.२२ दलघमी अर्थात २.९४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पातील उपयुक्त साठा १९६.५० दलघमी ६.९३ टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये ३१.५६ दलघमी म्हणजेच १.११ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.-जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोडा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर या चार प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त साठा झाला असून मोर प्रकल्पात ७१.८७ टक्के, बहुळा १४.२६ टक्के, गुळ ६४.३२ टक्के, बोरी १४.३७ टक्के उपयुक्त साठा आहे. अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अद्यापही फारसा साठा नाही. मात्र मंगरुळ, सुकी, मोर, तोंडापूर, गुळ या प्रकल्पांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.-जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त असला तरी नागरीकांनी व शेतकऱ्यांनी उपयुक्त पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.-हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत २४ गेट पूर्ण उघडले असून धरणातून ७३ हजार ७१३ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
गेल्या वर्षापेक्षा यंदा धरणांच्या साठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:20 PM