लोकमत न्यूजनेटवर्क
चाळीसगाव : शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त लोक जमवून कन्नडरोडस्थित कमलशांती पॕलेस मंगल कार्यालयात विवाह सोहळा साजरा करणाऱ्या लासूर येथील विवाह सोहळा आयोजकाला बुधवारी महसुलसह न. पा. व पोलिसांचा समावेश असलेल्या पथकाने ५० हजाराच्या दंडाची आकारणी करुन कारवाई केली. यामुळे काहीवेळ येथे वऱ्हाडी मंडळींमध्ये खळबळ उडाली होती.
औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील सूर्दशन जैस्वाल यांच्या कुंटूंबातील विवाह सोहळा बुधवारी दुपारी कमलशांती पॕलेस मंगल कार्यालयात होता. यासोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची खबर कोरोना प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. जवळपास १५० ते १६० वऱ्हाडी उपस्थित असल्याचे आढळून आले.
कोरोना महामारीत शासनाने जारी केलेल्या निर्देशात विवाह सोहळ्यात २५हून अधिक व्यक्ति उपस्थितीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. महसूलसह पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने विवाहाच्या आयोजकांकडून ५० हजाराचा दंड वसूल केला. मंगल कार्यालयाच्या मालकांकडूनही दोन दिवसांपूर्वी पाच हजाराचा दंड पथकाने वसूल केल्याची माहिती देण्यात आली.