तापमानाचा पारा वाढल्याने बाजारपेठेत शुकशुकाट
जळगाव : गेल्या आठवड्यापासून शहराचे तापमान ४० अंशांच्या वर जात असल्याने, दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी वाढलेल्या तापमानामुळे फुले मार्केट, दाणा बाजार, सुभाष चौक परिसरांत शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी पाचपर्यंत बाजारपेठेत तुरळकच गर्दी होती. सायंकाळी मात्र खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील नवी पेठ व शनिपेठेत करण्यात आलेल्या भुयारी गटारींच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी, परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.
उघड्यावरील डीपीमुळे अपघाताचा धोका
जळगाव : महावितरणतर्फे शहरात उघड्या डीपींना जाळी बसविण्यात आली असली तरी, नवी पेठेत काही ठिकाणी डीपी उघड्याच आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी महावितरणच्या प्रशासनाने तातडीने या ठिकाणी जाळी बसविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.
रेल्वे स्टेशनसमोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : रेल्वे स्टेशनसमोरील अतिक्रमणावर गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनातर्फे कारवाई करून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाची कारवाई थंडावल्याने पुन्हा या ठिकाणी जैसे थे अतिक्रमण झाले आहे. तरी महापालिका प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.